हे आहे थायलंडमधील ‘ड्रॅगन टेम्पल’

dragon
या बौद्ध मंदिराची रचना आगळी वेगळी आहे. हे बौद्ध मंदिर सर्वसामान्य मंदिरांच्या प्रमाणे निर्माण केले गेले नसून, तब्बल सतरा मजली आहे. इतकेच नव्हे तर या इमारतीला विळखा घालणारा प्रचंड मोठा ड्रॅगनही येथे बनविला गेला आहे. हा ड्रॅगन आतून पूर्ण पोकळ असून, याच्या आतमधून पर्यटकांना किंवा भाविकांना चालत मंदिराच्या वरच्या मजल्यापर्यंत जाता येते. म्हणूनच या मंदिराला ड्रॅगन टेम्पल असे ही म्हटले जाते. मूळचे ‘वात साम्फ्रान’ नामक हे मंदिर थायलंडमधील बँकॉक शहरापासून सुमारे तीस मैलांच्या अंतरावर उभे आहे.
dragon1
अतिशय भव्य आणि आगळ्या पद्धतीची रचना असणारे हे मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने मात्र काहीसे अज्ञातच राहिले आहे. या मंदिराची रचना चायनीज आणि थाय परंपरेनुसार केली गेली आहे. या मंदिराची रचनाही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराला विळखा घालणाऱ्या विशालकाय ड्रॅगनला पाच पंजे असून, हे पाच पंजे बौद्ध धर्मात सांगितलेल्या पाच तत्वांचे प्रतीक आहेत. या मंदिराची उंची ऐंशी मीटर असून, भगवान बुद्धांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले असल्याने या मंदिराची उंची ऐंशी मीटर आहे.
dragon2
मुळात बौद्ध भिक्षुंना या ठिकाणी ध्यानधारणा आणि बौद्ध धर्माचे अध्ययन करता यावे या करिता या मंदिराचे निर्माण करण्यात आले होते. मात्र या मंदिराचे बांधकाम पूर्ण न होऊ शकल्याने हे शक्य झाले नाही. मंदिराला विळखा घालणारा विशालकाय ड्रॅगन आतून पूर्ण पोकळ असून, यामधून चालत भाविकांना मंदिराच्या शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचता येते. वरपर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्या बोगाद्याप्रमाणे हा मार्ग आहे. या बोगद्याच्या शेवटी ‘आनंद’ किंवा सुख दर्शविणारी एक मूर्ती असून, या मंदिराची रचना करणाऱ्या अज्ञात बौद्ध भिक्षूला ही मूर्ती समर्पित आहे.

Leave a Comment