‘ही’ आहेत भारतातील प्राचीन सूर्यमंदिरे ki

mandir3

सूर्याला देवता मानून त्याचे पूजन करण्याची परंपरा जगातील काही देशांमध्ये आणि त्याचसोबत भारतामध्येही फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. सूर्याला समर्पित अशी भव्य मंदिरे भारतामध्ये अनेक ठिकाणी आहेत. मोढेरा येथील सूर्यमंदिर गुजरात राज्यामध्ये असून, हे ठिकाण अहमदाबाद पासून सुमारे शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे. या मंदिराचे निर्माण सम्राट भीमदेव सोलंकी यांनी करविल्याचा उल्लेख असणारा शिलालेख या मंदिरामध्ये आहे. सोलंकी वंश सूर्यवंशी असून, सूर्य हे या वंशाचे कुलदैवत होते. त्यामुळे त्यांच्या आराध्य देवतेला समर्पित असणाऱ्या या मंदिराचे निर्माण करविण्यात आले. भारतातील तीन अतिप्राचीन मंदिरांपैकी हे एक सूर्यमंदिर आहे.

mandir
या मंदिरामध्ये असलेली शिल्पकला या मंदिराची खासियत असून, या मंदिराची रचना इराणी शैलीची आहे. हे मंदिर तीन भागांमध्ये बनविले गेले असून, पहिला भाग या मंदिराचे गर्भगृह आहे, दुसरा भाग म्हणजे या मंदिराचा सभामंडप आणि तिसरा भाग सूर्य कुंड आहे. या मंदिराच्या सभागृहामध्ये अतिशय सुबक कोरीवकाम असलेले ५२ स्तंभ आहेत. सूर्योदय झाल्यावर सूर्याचे पहिले किरण गर्भगृहामध्ये पडतील अशा बेताने या मंदिराची रचना केली गेली आहे. सभागृहाच्या समोर असलेल्या सूर्यकुंडाला रामकुंड म्हटले जाते.

mandir1
ओडिशा राज्यातील कोणार्क येथील सूर्यमंदिर केवळ भारतातच नाही, तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. रथाच्या आकारात बनविले गेलेले हे सूर्यमंदिर प्राचीन भारतीय वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. राजा नरसिंहदेव यांनी तेराव्या शतकामध्ये या मंदिराचे निर्माण करविले होते. या मंदिराचा खास आकार आणि येथील शिल्पकला यामुळे या मंदिराची ख्याती जगभर आहे. या रथरूपी मंदिराला बारा पाषाणाची चाके असून, हा रथ ओढण्यासाठी पाषाणाचे सात घोडेही या रथाला जुंपलेले दिसतात. हे सात घोडे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक असून, बारा चाके बारा राशी दर्शवितात. या मंदिरामध्ये असलेली सूर्यदेवाची मूळ मूर्ती पुरी येथील जगन्नाथ मंदिरामध्ये सुरक्षित ठेवली गेली आहे.

mandir2
काश्मीर येथील श्रीनगरच्या जवळ असलेल्या अनंतनाग नामक लहानशा शहराजवळ, राजा ललितादित्याने सातव्या शतकामध्ये निर्माण करविलेले मार्तंड सूर्यमंदिर, एका लहानशा पठारावर आहे. या मंदिरामध्ये एकूण ८४ स्तंभ असून, या मंदिराचे निर्माण चुन्यापासून बनविलेल्या विटांचा वापर करून करण्यात आले होते. या मंदिराची राजसी वास्तुकला या मंदिराची खासियत आहे. सध्याच्या काळामध्ये या मंदिराचे केवळ अवशेषच पहावयास मिळत असले, तरी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत असते. या मंदिराची प्रतिकृती जम्मू येथे ही आहे. बिहार येथील भोजपूर जिल्ह्यामध्ये बेलाउर गावामध्ये असलेले सूर्यमंदिरही प्राचीन आहे. येथील राजा सुबा यांनी या गावामध्ये एकूण ५२ तलावांचे निर्माण करवून या तलावांच्या मध्यभागी सूर्य मंदिराचे निर्माण करविले होते. बिहार मध्ये ‘छठ’ पूजेचे मोठे महत्व असून त्यादिवशी सूर्याचे पूजन विशेष मानले जाते. त्यामुळे ‘छठ’ पूजेच्या निमित्ताने या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळते.
या सूर्यमंदिरांच्या खेरीज राजस्थानमधील उदयपूर जवळ असलेले रणकपूर मंदिर ही अतिशय भव्य असून, या संगमरवरी मंदिरामध्ये केले गेलेले कोरीव काम हे येथील प्रमुख आकर्षण आहे. या शिवाय रांची, मध्य प्रदेशातील उन्नाव, आणि बिहारमध्ये नालंदाच्या जवळ असलेल्या औंगारी आणि बडगाव येथे ही सूर्यमंदिरे आहेत.

Leave a Comment