अलाद्दिनच्या दिव्यातून बाहेर येणाऱ्या ‘जिनी’चा रंग निळाच का?

genie
वॉल्ट डिजनी प्रोडक्शनने सादर केलेला ‘अलाद्दिन’ हा चित्रपट सर्वप्रथम १९९२ साली प्रदर्शित झाला. तेव्हापासून अलाद्दिनचा ‘जिनी’ कायमच निळा असलेला पहावयास मिळाला. मूळ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कॉमिक्सच्या रूपातच नव्हे तर पुस्तके, इतकेच नव्हे तर ब्रॉडवे वरील नाटकामध्ये असलेला अलाद्दिनचा जिनी देखील निळ्या पोषाखामध्ये अवतरू लागला. २०१९ साली नव्याने सादर होत असणाऱ्या ‘अलाद्दिन’ या चित्रपटामध्ये जिनीची भूमिका सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ करीत असून, या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विल देखील निळाच असलेला पहावयास मिळत आहे. वॉल्ट डिजनी प्रोडक्शन निर्मित चित्रपटांचा रीमेक होत असताना मूळच्या चित्रपटामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये बदल केले जाण्याच्या बाबतीत जरी डिजनी प्रोडक्शन प्रसिद्ध असले, तरी अलाद्दिनच्या जिनीचा रंग मात्र कायमच निळा राहिला आहे.
genie1
केवळ अलाद्दिनच नाही, तर डिजनीच्या चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक पात्राशी निगडित रंगसंगती काही विशिष्ट उद्देशाने केली जात असल्याचे ‘स्मिथसोनियन’ इंस्टीट्युटचे म्हणणे आहे. अलाद्दिन चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर यातील प्रत्येक पात्राच्या बाबतीत वापरली गेलेली रंगसंगती त्या त्या पात्राबद्दल काही तरी सांगत असते. लाल आणि गडद रंग त्या पात्राचा नकारात्मक किंवा दुष्ट स्वभाव दर्शिवितात, तर हलके निळे, जांभळे, मोरपंखी रंग, हे ते पात्र सकारात्मक असल्याचे सूचक आहेत. म्हणूनच अलाद्दिन चित्रपटातील खलनायक जाफर हा नेहमी काळ्या आणि लाल कपड्यांमध्ये दिसतो, तर अलाद्दिन, त्याचा जिनी आणि कथेची नायिका जॅस्मिन हे नेहमी निळ्या, जांभळ्या किंवा सफेद पोशाखांमध्ये दिसतात.
genie2
तज्ञांच्या मते निळा रंग आकाश, जल, यांच्याबरोबरच जीवन, स्वातंत्र्य आणि आशेचे प्रतीक आहे. हा रंग विश्वासार्हतेचे आणि प्रामाणिकपणाचे ही प्रतीक आहे. म्हणूनच अलाद्दिनचा जिनी निळ्या रंगाचा दर्शविला गेला आहे. लाल, काळा आणि इतर गडद रंग हे बल, महत्वाकांक्षा, अहंकार यांचे प्रतीक असून, डिजनीच्या चित्रपटातील नकारात्मक पात्रे नेहमी याच रंगसंगतीच्या पोशाखांमध्ये दिसून येतात.

Leave a Comment