कधी होईल का या रहस्यांची उकल?

puzzle
मनुष्याने उत्तर आणि दक्षिण धृवावर अनेक मोहिमा फत्ते केल्या, त्याने लावलेल्या अनेक वैज्ञानिक शोधांमुळे आयुष्य सोपे झाले, अगदी चंद्रावरही मनुष्य जाऊन पोहोचला. पण तंत्रज्ञानाने, विज्ञानाने इतकी प्रगती करूनही मानवी इतिहासामध्ये अशा अनेक घटना घडून गेल्या आहेत, ज्या नेमक्या का घडल्या या रहस्याची उकल आजतागायत होऊ शकलेली नाही. अनेक चित्रविचित्र जीव पाहिले जाण्यापासून ते माणसांनी भरलेली संपूर्ण ट्रेन गायब होण्यापर्यंत अशी अनेक रहस्ये आहेत ज्यांचा उलगडा आजवर होऊ शकलेला नाही.
puzzle1
डायटलोव्ह पास नामक रशियातील एका निर्बीड, निर्मनुष्य प्रांतामध्ये १९५३ साली स्कीईंग करण्यासाठी गेलेल्या गटामधील सर्व व्यक्तींचा रहस्यपूर्ण रित्या मृत्यू झालेला आढळला. त्यावेळी तेथील तापमान -३० अंशांच्या ही खाली असूनही या सर्व व्यक्तींचे तंबू फाडून टाकण्यात आले असल्याचे, व त्यांच्या अंगावर अगदी थोडेसेच कपडे असल्याचे आढळून आले होते. तसेच मृत्यूपूर्वी या व्यक्ती बरेच अंतर चालून आल्या असून, त्यांची शरीरे ‘रेडीओअॅक्टिव्ह’ असल्याचेही आढळून आले होते. यांपैकी अनेकांना शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा दिसून आली नसली, तरी अंतर्गत इजा मोठ्या प्रमाणावर झाल्याचेही दिसून आले होते. काहींच्या कवट्या फ्रॅक्चर झाल्या होत्या, तर काहींच्या जीभा कापल्या गेल्या असल्याचेही निदान करण्यात आले. ही घटना नेमकी कशी घडली, कोणी घडवून आणली, या व्यक्ती इतक्या थंडीमध्ये देखील चालत इतक्या लांबवर कशा पोहोचल्या हे रहस्य आजवर उकललेले नाही.
puzzle2
मध्य युरोपमध्ये सापडलेल्या एका हस्तलिखिताने भाषाकार, लिपिकारांना आजवर बुचकळ्यात टाकलेले आहे. या अज्ञात लिपीला ‘द व्हॉयनिच स्क्रिप्ट’ असे नाव देण्यात आले असून, हे हस्तलिखित सुमारे २४६ पानांचे आहे. या हस्तलिखितातील प्रत्येक पानावर अतिशय सुंदर, रंगेबिरंगी आकृती असून, हे हस्तलिखित सुमारे सहाशे वर्षांपूर्वीचे असावे असा तज्ञांचा अंदाज आहे. इतके संशोधन करूनही ही लिपी, यातील आकृतींचा अर्थ लावण्यात आजवर तज्ञांना यश आलेले नाही. या हस्तलिखितामध्ये अनेक गूढ रीती दर्शविणाऱ्या आकृतींपासून विशालकाय ड्रॅगन्सच्या आकृती देखील चितारलेल्या आहेत.
puzzle3
स्कॉटलंड येथील डंबार्टन भागामध्ये असलेल्या, ‘द ओव्हरटाऊन ब्रिज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुलाशी एक विचित्र रहस्य निगडित आहे. दिसायला एखद्या सामान्य पुलाप्रमाणेच असलेल्या या ठिकाणी आल्यानंतर कुत्री अचानक सैरभैर होऊन पुलावरून खाली उडी मारत असल्याचे पाहिले गेले आहे. आजवर पन्नासच्या वर कुत्री या पुलावरील एका विवक्षित जागेवरून खाली उडी मारल्याने प्राणांना मुकली आहेत. असे का घडते याचे कारण आजवर कोणीही शोधून काढू शकलेले नाही. न्यू मेक्सिको येथे असणाऱ्या ताओस गावामध्ये सतत एक विचित्र आवाज येत असतो. अशा प्रकारचा ध्वनी केवळ याच गावामध्ये ऐकला जात असून, या ध्वनीच्या रहस्याने लोकांना इतके भंडावून सोडले आहे, की या ध्वनीचे नामकरणच मुळी ‘द ताओस हम’ असे करण्यात आले आहे. हा ध्वनी कुठून आणि कसा उत्पन्न होतो यामागचे खरे कारण आजवर कोणालाच सापडलेले नाही. भूपृष्ठाखाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्सच्या होणाऱ्या हालचालींमुळे हा ध्वनी उत्पन्न होत असावा असे काहींचे म्हणणे आहे, तर या प्रांतामध्ये असलेल्या अमानवी शक्तीचा आवाज असल्याचेही अनेक कयासही आजवर लावले गेले आहेत.

Leave a Comment