कलियुगाचा अंत करण्यासाठी तिळातिळाने वाढत आहे या नंदीचा आकार

yaganti

धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये कलियुगाचे अनेक उल्लेख आहेत. तसेच या युगाच्या अंताच्या बाबतीत ही अनेक गोष्टी धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितल्या गेल्या आहेत. या संदर्भातील एका मान्यतेच्या अनुसार कलियुगाचा अंत भगवान शिवशंकरांचे वाहन असलेल्या नंदी महाराजांच्या हातून होणार आहे. कलियुगाचा अंत जवळ आला, की नंदी पुनर्जीवित होतील आणि त्यानंतर धरतीचा अंत होईल असे भाकित पुराणांमध्ये केले गेले आहे. याच मान्यतेमुळे भगवान शिवाच्या सोबत त्यांचे वाहन असलेल्या नंदीचे पूजनही मोठ्या श्रद्धेने केले जात असते.

yaganti1
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यामध्ये असलेले यांगती उमा महेश्वर मंदिर याच श्रद्धेला समर्पित आहे. या मंदिरामध्ये असलेली नंदीची पाषाणमूर्ती रहस्यमय रित्या दिवसेंदिवस आकाराने वाढत असल्याचे म्हटले जाते. या कारणास्तव कुरनूलमध्ये असलेले हे यांगती उमा महेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे नंदीमहाराजांच्या आकाराने वाढत जाणाऱ्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करीत असतात. या मंदिरातील नंदीच्या मूर्तीच्या आकारामध्ये दर वीस वर्षांनी सुमारे एक इंचाची वाढ होत असल्याचे म्हटले जाते.

yaganti2
अनेक वर्षांपूर्वी या मंदिरामध्ये येणारे भाविक मंदिरामध्ये असलेल्या नंदीच्या मूर्तीची प्रदक्षिणा सहजगत्या करू शकत असत. मात्र नंदीच्या मूर्तीचा आकार सातत्याने वाढत असल्याने आता या मूर्तीला प्रदक्षिणा घालता येणे अशक्य होण्याइतपत या मूर्तीचा आकार वाढला असल्याचे म्हटले जाते. या मूर्तीच्या आकारामध्ये सातत्याने होणारी वाढ लक्षात घेता या मूर्तीच्या जवळ असलेला एक स्तंभ हलविण्यात आला असून, त्यामुळे या मूर्तीच्या विस्ताराकरिता जास्त जागा मंदिराच्या प्रशासनाने उपलब्ध करवून दिली आहे.

yaganti3
या मंदिराचे निर्माण पंधराव्या शतकामध्ये संगमा राजवंशाचे राजे हरिहर बुक्का यांनी करविले होते. या मंदिराच्या बाबतीत एक आख्यायिका आहे ती अशी, की हे मंदिर आता जिथे उभे आहे, त्याच ठिकाणी अगस्त्य ऋषींना वेंकटेश्वर मंदिर उभारायची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार हे मंदिर बनविले गेले देखील, मात्र मंदिरामध्ये वेंकटेश्वराची मूर्ती स्थापित होत असताना या मूर्तीच्या पायाच्या बोटाचे नख भंगले. असे होण्यास काय कारण झाले असावे हे जाणून घेण्यासाठी अगस्त्य ऋषींनी शिवशंकरांची तपस्या सुरु केली. या तपस्येच्या फलस्वरूप शिवांनी प्रकट होऊन उमा-महेश आणि नंदीची मूर्ती या ठिकाणी स्थापित केली जावी असा द्रष्टांत ऋषींना दिला. तेव्हापासून या मंदिरामध्ये उमामहेश आणि नंदीच्या मूर्ती असल्याची ही आख्यायिका आहे.

yaganti4
मंदिरात असणारी नंदीची मूर्ती आकाराने सातत्याने वाढत जाण्यामागचे कारण शोधून काढण्याचा प्रयास भारतीय पुरातत्वखात्याच्या वतीने करण्यात आला. यासाठी केल्या गेलेल्या संशोधनामध्ये नंदीची पाषाणमूर्ती बनविण्यासाठी वापरला गेलेला पाषाण सतत आकराने वाढत जाणारा, म्हणजेच ‘एक्स्पांड’ होणारा असल्याचा निष्कर्ष निघाला. या मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या एका जलकुंडाविषयी देखील एक रोचक आख्यायिका आहे. हे जलकुंड ‘पुष्करिणी’ या नावाने प्रसिद्ध असून, याच्या काठावर बनविल्या गेलेल्या गोमुखामधून पाण्याची संततधार या जलकुंडामध्ये पडत असते.

yaganti5

हे पाणी या गोमुखातून कुठून येते हे रहस्य मात्र आजतागायत कोणालाही उलगडू शकलेले नाही. याच जलकुंडामध्ये स्नान करून अगस्त्य ऋषी शिवाराधनेसाठी सिद्ध झाले असल्याचे ही म्हटले जाते. तसेच तपाला बसलेले असताना कावळ्यांच्या आवाजाने तपस्या भंग होऊ नये या करिता अगस्त्य ऋषींनी कावळ्यांना शाप दिला असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच की काय, या मंदिराच्या परिसरामध्ये एकही कावळा दृष्टीस पडत नाही.

Leave a Comment