रामायणातील अनेक प्रमुख व्यक्तीरेखांपैकी एक असलेली मंदोदरी, दैत्यराज मयासुराची कन्या आणि लंकाधिपती रावणाची पत्नी होती, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याच मंदोदरीशी निगडित काही रोचक कथा जाणून घेऊ या. हिंदू पुराणांमध्ये उल्लेखिलेल्या एका कथेनुसार एकदा मधुरा नामक अप्सरा कैलास पर्वतावर पोहोचली. देवी पार्वती कुठेच दिसत नाही असे पाहून मधुरा भगवान शंकरांना आकृष्ट करून घेण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथे आलेल्या देवी पार्वतीने हे पाहिले आणि घडल्या प्रकाराने संतप्त होऊन तिने मधुरेला बारा वर्षे बेडूक होऊन विहिरीत राहण्याचा शाप दिला. भगवान शिवांनी पार्वतीची पुष्कळ मनधरणी केल्यानंतर पार्वतीने मधुरेला उ:शापही दिला. कठोर तपस्या केल्यानंतरच मधुरेला तिचे पूर्वीचे रूप पुन्हा प्राप्त होईल असा हा उ:शाप होता.
त्यानंतर मधुरेने अनेक वर्षे कठोर तप केले. या दरम्यान दैत्यराज मयासुर व त्याची अप्सरा पत्नी हेमा यांनी अपत्यप्राप्ती करीता तप केले. त्याचवेळी मधुरेची तपस्या सफल होऊन ती शापमुक्त झाली. विहिरीमध्ये मधुरेचा आवाज ऐकून मयासुराने तिला बाहेर काढले व तिचा पुत्री म्हणून स्वीकार केला. मयासुराने आपल्या कन्येचे नाव मंदोदरी ठेवले. एकदा रावण मयासुराला भेटण्यास आला असता अतिशय मनमोहक रूपाच्या मंदोदरीला त्याने पाहिले आणि तिला पाहताच तो जणू मंत्रमुग्ध झाला. रावणाने मंदोदरीशी विवाह करण्याची इच्छा मयासुराकडे प्रकट केली, पण मयासुराने रावणाचा प्रस्ताव अमान्य केला. मयासुराचा विरोध न जुमानता रावणाने आपला हट्ट पूर्ण करीत मंदोदरीशी जबरदस्तीने विवाह केला.
रावण अतिशय हट्टी स्वभावाचा बलशाली दैत्य आहे याची कल्पना मंदोदरीला होतीच. त्यामुळे आपण त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला, तर त्याचे दुष्परिणाम आपल्या पित्याला भोगायला लागतील हे ओळखून मंदोदरीने देखील रावणाशी विवाह करण्याची तयारी दर्शविली. रावण आणि मंदोदरी यांना पुढे मेघनाद, अक्षय कुमार, आणि अतिकाय हे तीन पुत्र झाले. रावण अतिशय अहंकारी होता. त्याचे वर्तन कधी ना कधी त्याला विनाशाकडे घेऊन जाणार आहे याची पूर्ण कल्पना असलेल्या मंदोदरीने रावणाला योग्य मार्गावर आणण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, पण तिच्या कोणत्याच प्रयत्नांना रावणाने दाद दिली नाही.
रावणाचा अंत श्रीरामांच्या हातूनच होणार आहे याची कल्पना असणाऱ्या मंदोदरीने रावणाची मनधरणी करून त्याने सीतेला परत रामाकडे पाठविण्याचा आग्रह धरला खरा, पण रावणाने तिचा आग्रह धुडकावून लावला. रावणाचा वध झाल्यानंतर मंदोदरीने रावणाचा भाऊ विभिषणाशी विवाह केला असे म्हटले जाते, तर काही आख्यायिकांच्या अनुसार मंदोदरी रावणाच्या अंत्यविधीच्या वेळी चितेवर सती गेल्याचेही म्हटले जाते.