जाणून घेऊ या युनानी खाद्य परंपरेविषयी काही

unani
पनीर, ऑलिव्ह ऑईल, मिश्र भाज्यांचे सॅलड आणि ताजी फळे व भाज्या यांवर युनानी खाद्यपरंपरेमध्ये अधिक भर दिला जातो. म्हणूनच ही खाद्य परंपरा भारतामध्ये वेगाने लोकप्रिय होत आली आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळी एक अतिशय पराक्रमी युनानी शासक दिग्विजयी मोहिमेवर भारतापर्यंत येऊन ठेपला खरा, पण भारतामध्ये शिरून गंगेपर्यंत पोहोचण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे सिंधू नदीच्या जवळील प्रांतांमध्ये त्याने आपले साम्राज्य स्थापन केले. या साम्राज्याचा प्रभाव भारतावरही पडू लागला. ‘गांधारी’ ढंगाची शिल्पकला, नाट्यमंचांवरील ‘यवनिका’ आणि ‘युनानी औषधोपचार’ यांची ओळख भारताला युनानी किंवा यवनी साम्राज्याकडून झाली.
unani1
आताच्या काळामध्ये युनानी खाद्यपरंपरेला ‘मेडिटेरेनियन’ खाद्यसंस्कृती म्हटले जाते. हे भोजन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय परिपूर्ण मानले गेले आहे. या भोजनामध्ये दही, चीझ, ताज्या भाज्यांची सॅलड्स, हिरव्या पालेभाज्या, मासे आणि इतर सीफूड यांना महत्व असून, जेवणाच्या सोबत मदिरा पान केले जाणे सर्वमान्य आहे. द्राक्षे, आणि इतर हंगामी फळांचा ही या खाद्यसंस्कृतीतील पदार्थ बनविताना मुबलक वापर होतो. ‘मुसाका’ हा मटणाचा पदार्थ, वांग्याचे तळलेले काप, द्राक्षांच्या पानांमध्ये भात लपेटून बनविलेले, स्प्रिंग रोल्सप्रमाणे दिसणारे ‘डोल्मा’ इत्यादी पदार्थ युनानी खाद्य परंपरेच्या खासियती आहेत.
unani2
या खाद्यपरंपरेमध्ये मसाले म्हणून ताजा पुदिना, कोथिंबीर, आणि तत्सम इतर वनस्पतींचा वापर केला जातो. तसेच लवंगा, जायफळ आणि जायपत्रीही या पदार्थांमध्ये वापरली जाते. गोड पदार्थांसाठी मध आणि आंबट चवीच्या पदार्थांमध्ये लिंबाचा रस वापरला जातो. हे सर्व पदार्थ भारतीय खाद्यपरंपरेला आधीपासूनच ओळखीचे असून, त्यामुळे युनानी खाद्यपरंपरा भारतीय पदार्थांमध्येही चांगली एकरूप होत गेली.

Leave a Comment