अपघातानेच लागला या खाद्यपदार्थांचा शोध

food
गरज ही शोधांची जननी असते असे म्हटले जात असतानाच या जगामध्ये काही खाद्यपदार्थांची निर्मिती किंवा शोध मात्र अपघातानेच घडून आले. पण पुढे हे खाद्यपदार्थ इतके लोकप्रिय झाले, की ते केवळ त्या विशिष्ट ठीकाणापुरते मर्यादित न राहता आता जगभरातच लोकप्रिय झाले आहेत. ख्रिस्तपूर्व २००० सालापासून ते आजच्या काळापर्यंत नव्याने बनविण्यात येत असलेल्या या पदार्थांचा शोध केवळ मूळ पदार्थ बनविण्यात काही चूक झाल्यामुळे किंवा तत्सम एखाद्या कारणामुळे, अगदी अपघातानेच लागला.
food1
अमेरिकेतील बफेलो या प्रांताची खासियत असणाऱ्या ‘बफेलो विंग्ज’ या पदार्थाचा शोध योगायोगच म्हणायला हवा. सुमारे साठ वर्षांपूर्वी या पदार्थाचा शोध अगदी अचानकच लागला. तळून काढलेले ‘चिकन विंग्ज’ आणि त्याबरोबर ‘ब्ल्यू चीज डिप’ असा हा पदार्थ बफेलो येथील ‘द अँकर बार’मध्ये १९६४ साली प्रथम तयार करण्यात आला होता. त्याकाळी चिकनचे सर्व भाग भोजनामध्ये वापरले आत असून, चिकन विंग्ज मात्र निरुपयोगी म्हणून टाकून दिले जात असत. पण हे विंग्ज असेच वाया घालविण्याच्या ऐवजी त्यांचे काही करता येईल का हे पाहण्याच्या प्रयत्नात ‘द अँकर बार’ची मालकीण असलेल्या तेरेसा बालीसिमो हिने हे विंग्ज मसाल्यांचे आणि ब्रेड क्रम्ब्जचे मिश्रण लावून तळून पहिले आणि अशा रीतीने ‘डीप फ्राईड चिकन विंग्ज’ चा जन्म झाला. आताच्या काळामध्ये हा पदार्थ जगभरात लोकप्रिय आहे.
food2
बाहेरून खमंग पण आतून काहीशा ओलसर पण चविष्ट असणाऱ्या ‘चॉकोलेट ब्राउनी’ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण चवीने खात असतात. पण यांचाही शोध लागला तो अपघातानेच. झाले असे, की अमेरिकेतील मेन राज्यातील बांगोर शहरामध्ये राहणारी बेटी क्रोकर नामक गृहिणी एकदा केक बनवीत असताना त्यामध्ये बेकिंग पावडर घालण्यास विसरली. त्यामुळे बेटीचा चॉकोलेट केक फुगला नाही. पण केक बनविण्याचा हा प्रयत्न फसला असूनही तयार झालेला पदार्थ इतका चविष्ट बनला होता, की त्याच्या वड्या कापून बेटीने हा पदार्थ ब्राउनी म्हणून सर्व्ह केला. आताच्या काळामध्ये चॉकोलेट ब्राउनी हा पदार्थ आपल्या चांगल्याच परीचयाचा आणि आवडता देखील आहे.
food3
चौदाव्या शतकामध्ये वाईन बनविण्याचा प्रयत्न फसला. झाले असे, की वाईन बनविण्याच्या काळामध्ये अचानक खूप कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्षांचा रस पुरेसा ‘फर्मेंट’ झालाच नाही. आणि थंडीनंतर आलेल्या वसंत ऋतूमध्ये हवामान काहीसे उष्ण झाले, तेव्हा या वाईनमध्ये कार्बन डाय ऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणावर तयार झाला. हा वायू वाईनच्या बाटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याने त्याच्या दबावामुळे बाटल्या फुटू लागल्या. त्यामुळे त्या मद्यचे लवकरात लवकर सेवन केले जाणे गरजेचे होऊन बसले. लोकांना सुरुवातीला पसंत न पडलेले, चवीला निराळेच असणारे हे मद्य हळू हळू खूपच लोकप्रिय होऊ लागले. हे मद्य ग्लासमध्ये ओतल्यानंतर यातील वायुमुळे यामध्ये उत्पन्न होणारे, आणि लाखो ताऱ्यांप्रमाणे चमकणारे बुडबुडे या पेयाचे मुख्य आकर्षण ठरले आणि ‘बबली’ या टोपणनावाने ओळखल्या जाणऱ्या ‘शँपेन’चा जन्म झाला.
food4
१८९४ साली जॉन आणि विल केलॉग या बंधूंपैकी एकाने उकडलेले गहू स्वयंपाकघरामध्ये ठेवले आणि त्याच्यातून काही तरी पदार्थ बनविण्याचा विचार करून तो आपल्या कामामध्ये गुंतला. उकडून ठेवलेल्या गव्हाचा विलला पूर्णच विसर पडला. अचानक गव्हाची आठवण झाल्यानंतर त्याने स्वयंपाकघरामध्ये धाव घेतली खरी, पण तोवर गहू थंड आणि शिळे झाले होते. इतक्या गव्हाचे करायचे काय याचा विचार करीत असता विलला एक कल्पना सुचली. त्याने हे गहू लाटून घेऊन त्याच्या छोट्या छोट्या पापड्या बनविल्या आणि त्या भट्टीमध्ये भाजून घेतल्या. भाजेलेल्या या पापड्या दुधामध्ये भिजवून खाता येण्याजोग्या बनल्या. पुढे हाच प्रयोग विल आणि जॉनने मका वापरून केला, आणि त्यांच्या प्रयत्नांनी तयार झालेला पदार्थ ‘कॉर्न फ्लेक्स’ या नावाने ओळखला जाऊन आज आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन आहारातला हा आवडता पदार्थ आहे.

Leave a Comment