असा आहे लवंगेचा इतिहास

clove
लवंग हा मसाल्याचा पदार्थ सर्वच घरांमध्ये हमखास आढळणारा आहे. या पदार्थाचा वापर आपण अनेकदा करीत ही असतो. कधी स्वयंपाकामध्ये तर कधी दातदुखी कमी करण्यासाठी या पदार्थाचा वापर हटकून केला जातो. लवंग हा मसाल्याचा पदार्थ आज जगभरामध्ये वापरला जाणारा आणि सहज उपलब्ध होणारा असला, तरी हा पदार्थ जेव्हा प्रथमच वापरला जाऊ लागला, तेव्हा हा केवळ काही मर्यादित प्रांतांमधेच उपलब्ध होता.
clove1
बीबीसीने प्रसारित केलेल्या एका रिपोर्टनुसार लवंगेची झाडे आजच्या काळापासून सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी केवळ आशिया खंडातील काही द्वीपांवर आढळत असत. इंडोनेशियातील टर्नेट नामक द्वीपावर लवंगेचा सर्वात पहिला वृक्ष आढळल्याचे म्हटले जाते. टर्नेट द्वीप तेथे असलेल्या अनेक ज्वालामुखींसाठी ओळखले जाते. तरीही पर्यटक येथे भटकंती करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. टर्नेट, त्याच्या जवळ असलेले तिदोर आणि आसपासच्या काही द्वीपांवर लवंगेचे वृक्ष सर्वप्रथम दिसून आल्याचे म्हटले जाते. त्यावेळी लवंगेचा वापर कसा करायचा हे लक्षात आल्यानंतर या पदार्थाचा व्यापार सुरु झाला आणि कालांतराने जगभरातच हा पदार्थ घराघरात जाऊन पोहोचला. ज्यांनी लवंगांचा व्यापार सुरु केला, त्यांना यातून आर्थिक मिळकतही पुष्कळ झाली.
clove2
जेव्हा टर्नेट आणि तिदोर द्वीपांच्या राज्यकर्त्यांनी लवंगांचा व्यापार करून त्याद्वारे अफाट संपत्ती कमविली, तेव्हा आपणच कसे बलशाली हे एकमेकांना दाखवून देण्याची चढाओढ त्यांच्यामध्ये सुरु झाली. त्यांच्या या मतभेदांचा फायदा घेऊन इंग्रज आणि डच लोकांनी या प्रांतांवर आधिपत्य प्रस्थापित केले आणि लवंगांचा व्यापार आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर कित्येक वर्षांपर्यंत युरोपीय व्यापाऱ्यांनी लवंगांच्या व्यापारामध्ये आर्थिक गुंतवणूक करून भरपूर संपत्ती कमविली.

Leave a Comment