विन्स्टन चर्चिल यांच्या जन्मस्थळाची सफर घडविणार ‘बेटी’ रोबोट

robo
ब्रिटनचे दिवंगत पूर्व पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थळ असलेले ब्लेनहीम पॅलेस हे वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असून, या पर्यटकांना ‘गाईडेड टूर’ करविण्यासाठी आता ‘बेटी’ची नेमणूक करण्यात आली आहे. पाच फुट उंची असणारा हा रोबोट पर्यटकांना संपूर्ण ब्लेनहिम पॅलेसची सफर करविणार असून, पर्यटकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे ही देणार आहे. इंग्लंड येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रोबोटिक्स इंस्टीट्युटने बेटी रोबोट तयार केला आहे. यामध्ये सर्वात विशेष गोष्ट अशी, की येथे आलेल्या पर्यटकांच्या बरोबर आपले एक छायाचित्र काढून, ते ‘बेटी इन द पॅलेस’ या कॅप्शनसह सोशल मिडीयावर पोस्ट करण्याची कामगिरी देखील बेटी करणार आहे.
robo1
येथे येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण ब्लेनहीम पॅलेस फिरून दाखविण्याचे काम बेटी दिवसाचे बारा तास करणार असून, त्या अवधीनंतर रिचार्ज होण्यासाठी हा रोबोट आपोआप ‘स्वीच ऑफ’ ही होत असल्याचे समजते. ब्लेनहीम पॅलेसचा संपूर्ण इतिहास, या ठिकाणाशी निगडित महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना या ही सर्व तथ्ये या रोबोटच्या मेमरी मध्ये फीड करण्यात आली आहेत. म्हणूनच पर्यटकांना या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यास व त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास बेटी संपूर्णपणे सिद्ध असल्याचे ब्लेनहीम पॅलेसच्या प्रवक्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. बेटीच्या प्रायोगिक चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या पासून बेटी आपल्या नव्या कामगिरीवर या वर्षी रुजू होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या महालामध्ये अनेक प्राचीन मौल्यवान वस्तूंचा संग्रह असून, या वस्तूंच्या फार निकट बेटीला न जाऊ देण्याची खबरदारी या पॅलेसचे कर्मचारी घेत आहेत.

Leave a Comment