ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची महादशा व अंतर्दशा सुरु असेल, त्यामुळे त्या व्यक्तींना आयुष्यात सातत्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींचे निवारण होण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत. ग्रह विपरीत असले तर त्याचे परिणाम व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक रूपामध्ये दिसून येत असतात. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक शुभाशुभ गोष्टीदेखील ग्रहांमुळे घडत असल्याचे म्हटले जाते. या ग्रहांचे आपल्या आयुष्यामध्ये होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी त्या त्या ग्रहासाठी अनुकूल असलेला धातू धारण करण्याचा सल्ला ज्योतिशास्त्र देत असून, या धातूंचा आणि ग्रहांचा थेट संबंध असल्याची मान्यता या शास्त्रामध्ये आहे. त्यामुळे एखाद्या ग्रहामुळे आयुष्यात येणाऱ्या विपदा त्या ग्रहाशी संबंधित धातू धारण केल्याने पुष्कळ अंशी टाळता येऊ शकतात.
हाताच्या बोटामध्ये लोहाची अंगठी का परिधान केली जाते?
लोह धातूने बनलेल्या वस्तू शनीला प्रिय असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या ग्रहाचा दुष्प्रभाव टाळण्यासाठी लोहाने बनविली गेलेली अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये धारण केली जाते. या बोटाच्या खाली हातावर शनीचा पर्वत असल्याने त्यावर या अंगठीचा प्रभाव पडण्यासाठी ही अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये धारण करण्याची पद्धत रूढ आहे. ही अंगठी धारण केल्याने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असल्याचे म्हटले जाते.
तसेच अनेक व्यवसायाच्या ठिकाणी लोखंडाने बनलेली घोड्याची नालही कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावलेली दिसते. शनीचा दुष्प्रभाव कमी होऊन व्यवसायामध्ये बरकत व्हावी या उद्देशाने ही नाल लावण्याची पद्धत आहे. ज्योतिषशास्त्रातील नियमांच्या अनुसार ही नाल घोड्याच्या पायातून आपोआप उतरून आलेली असावी. या नालेचे पूजन करून ही नाल सिद्ध करून घेऊन शनिवारच्या दिवशी ही नाल आपल्या कार्यालयामध्ये लावल्याने शनीची कृपादृष्टी प्राप्त होत असल्याचे म्हटले जाते.