भारतातील काही नैसर्गिक आश्चर्ये पहा ‘या’ ठिकाणी

Double-decker0

जगातील पाच मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांबद्दल आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, पण भारतामध्ये ही काही राज्यांमध्ये अशी ठिकाणे आहेत, जिथे तरंगत्या सरोवरापासून ते ‘डबल डेकर’ पुलापर्यंत अनेक निसर्गाने घडविलेले चमत्कार आपण पाहू शकतो. या ठिकाणांना निसर्गाचा वरदहस्त लाभलेला असून, या ठिकाणी असलेली ही नैसर्गिक आश्चर्ये खरोखरच मन मोहवून घेणारी आहेत. ही नैसर्गिक आश्चर्ये भारतामध्ये कुठे आहेत हे जाणून घेऊ या.

चेरापुंजी या ठिकाणाची ओळख आपल्याला भारतामध्ये सर्वाधिक वृष्टी होणारे ठिकाण म्हणून आहे. पण या शिवाय चेरापुंजी येथील वनराईमध्ये ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ किंवा ‘डबल डेकर ब्रिज’ या नावाने संबोधले जाणारे नैसर्गिक रित्या तयार झालेले पुल आढळतात. हे पुल ‘फिकस इलास्टिक’ नामक झाडांच्या पासून आपोआप तयार झाले असून, असे अनेक पुल या ठिकाणी पहावयास मिळतात. हे पूल अतिशय मजबूत समजले जातात.
Double-decker
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे असलेले ‘मार्बल रॉक्स’ नर्मदेच्या किनारी उभे आहेत. तीन किलोमीटरपर्यंत विस्तारलेले हे मार्बल रॉक्स पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असतात.
Marble
मणिपूर राज्यामध्ये असलेले लोकताक सरोवर ‘फ्लोटिंग’, म्हणजेच तरंगणारे सरोवर म्हणून ही ओळखले जाते. या सरोवराच्या पाण्यावर अनेक वनस्पती आणि साचलेल्या इतर गाळामुळे लहान लहान बेटे तयार झाली असून, ही बेटे या सरोवराच्या पाण्यावर तरंगत असतात. या लहान लहान बेटांना ‘कुंदी’ म्हटले जाते. या सरोवरावर तरंगणारे सर्वात मोठे बेट ‘केयुबल लामाजाओ’ या नावाने ओळखले जात असून, चाळीस स्क्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये हे बेट विस्तारलेले आहे. या बेटाला भारत सरकारच्या वतीने ‘संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले असून, मणिपूरवासियांच्यासाठी लोकताक सरोवराला मोठे पारंपारिक महत्वही आहे.
Floating
आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्याशी असलेले मजूली आयलंड हे जगातील सर्वात मोठे ‘रिव्हर आयलंड’ म्हणून ओळखले जाते. येथे आढळणाऱ्या तऱ्हे-तऱ्हेच्या वनस्पती आणि जीवजंतू यांमुळे ही बेट पर्यटक आणि अभ्यासकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरत आले आहे. इतकेच नव्हे, तर विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या आणि जीवजंतूच्या अनेक प्रजातीही या आयलंडवर पहावयास मिळतात. मजूली आयलंडला आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून ही ओळखले जाते. आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी पासून हे आयलंड सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर आहे.
River-Island-Assam

 

Leave a Comment