आता चोरी करण्यासाठी देखील निघाली ‘व्हेकन्सी’

advt
सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये मनासारखी नोकरी मिळणे ही सहजसाध्य होणारी गोष्ट राहिलेली नाही. तसेच शिक्षित जनसंख्या वाढल्यामुळे एखादी नोकरी पटकन मिळणे अंमळ कठीणच होऊन बसले आहे. मनासारख्या नोकऱ्या मिळण्याची संधी उपलब्ध होत नसल्याने अनेकांवर रिकामेच बसून राहण्याची वेळ येत असते. अश्या वेळी काही जण गैरमार्गाने पैसा मिळविण्याच्या अनेकविध युक्त्या शोधून काढीत असतात. त्यातूनच चोऱ्या, फसवणुकी असल्या प्रकारच्या गुन्ह्यांचा जन्म होत असतो. चोऱ्या करणाऱ्यांना जरी आपण वाईट म्हणत असलो, तरी आता या कामालाही चांगला आणि नियमित मोबदला मिळेल अशी चिन्हे आहेत. आता, सराईतपणे चोऱ्या करणाऱ्या चोरांना चक्क नोकरी मिळण्याचे दिवसही आले आहेत.
advt1
इंग्लंडमध्ये चक्क ‘चोर पाहिजेत’ अश्या अर्थाची धक्कादायक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही नोकरीची भरती विशेषकरून हुशार चोरमंडळींकरिता आहे. अत्यंत सफाईने चोरी करणाऱ्या चोरांना या नोकरीसाठी अर्ज देता येणार असून, चोरी करण्याप्रमाणेच चोरी कशी करावी, कुठे करावी याच्या नवनवीन कल्पना देणाऱ्यांना देखील येथे नोकरी देण्यात येणार आहे. या कामासाठी चोरांना चोरी सराईतपणे पार पाडल्यानंतर दर तासासाठी ६५ डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनामध्ये तब्बल ४,५०० रुपये मिळणार आहेत.
advt2
इंग्लंडमधील एका कपड्यांच्या भव्य शो रूमच्या मालकिणीने ही जाहिरात प्रसिद्ध केली असल्याचे समजते. बार्क डॉट कॉम नामक वेबसाईटवर या मालकिणीने ही जाहिरात प्रसिद्ध केली असून, तिच्याच दुकानामध्ये दर एका तासाने चोरांनी चोरी करणे गरजेचे असल्याची विचित्र अटही या जाहिरातीमध्ये आहे. या दुकानामध्ये चोऱ्या कशा कशा प्रकारे करणे शक्य आहे हे जाणून घेणे, हा या जाहिरातीमागचा हेतू असल्याचे या मालकीणबाई म्हणतात. सध्या नाताळचा सण तोंडावर असून, त्यासाठी कपडे आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. यामध्ये सर्व लोकांवर लक्ष ठेवणे अशक्य असल्याने दुकानांमधून लहान मोठे सामान चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडत आहेत. चोऱ्या नक्की कशा प्रकारे केल्या जात आहेत हे समजून घेतल्यानंतर सुरक्षा व्यवस्था आखता येणे शक्य होणार असल्याचे या मालकीणबाईंचे मत आहे. या वर तोडगा म्हणून मालकीणबाईंनी अखेर ‘चोर पाहिजेत’ अश्या अर्थाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या कामावर नेमणूक होणाऱ्या चोरांनी चोऱ्या कश्या प्रकारे केल्या आहेत, काय युक्त्या वापरल्या आहेत याचा अभ्यास दुकानाच्या मालकीणबाई करणार असून, त्यानुसार सुरक्षाव्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a Comment