जपान देशातील एक चिमुकली तिच्या हेअर स्टाईलमुळे खूपच प्रसिद्ध झाली असून, सुंदर केस असलेल्या या मुलीची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या मुलीचे काळेभोर, रेशमी केस लोकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. इतकेच नव्हे, तर ही छायाचित्रे जपानमधील लोकप्रिय शँपू बनविणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहिल्यानंतर त्या कंपनीच्या वतीने या लहानगीला चक्क शँपूच्या जाहिरातीची मॉडेल बनण्यासाठी ऑफरही देण्यात आली असून, या चिमुकलीचे छायाचित्र शँपूच्या बाटलीच्या रॅपरवर झळकले आहे.
या मुलीचे नाव चांको असून, हिची अनेक सुंदर छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत. इतक्या छोट्याश्या चांकोचे सुंदर केस आकर्षणाचा विषय ठरत आहेत. बेबी चांकोची छायाचित्रे इन्स्टाग्रामवरही खूपच लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहेत. चांकोच्या चेहऱ्याच्या गोंडसपणामध्ये भर टाकणारी आहे, तिच्या सुंदर केसांची तिच्या चेहऱ्याभोवती असलेली महिरप. इतक्या लहान वयातच चांकोला काळ्याभोर, घनदाट आणि रेशमासारख्या मुलायम केसांचे वरदान निसर्गाने दिलेले आहे. तिच्या या केसांवरच हजारो लोकांची मने भाळली आहेत.
चांकोची छायाचित्रे पाहून एक प्रसिद्ध जपानी शँपू कंपनीने तिला शँपूच्या जाहिरातीमध्ये मॉडेलिंगची ऑफर दिली असल्याने आता चांकोचा चेहरा आणि तिचे सुंदर केस या शँपूच्या बाटल्यांवरही झळकत आहेत. ही कंपनी जगभरामध्ये लोकप्रिय असलेला ‘पँटीन’ शँपू तयार करीत असून, याच शँपूच्या बाटल्यांवर चांकोचा चेहरा सध्या पाहायला मिळत आहे.