कोरियातील आगळे वेगळे ‘इम्सील चीझ थीम पार्क’

theme-park
वास्तविक एके काळी कोरिया देशामध्ये चीझ हा खाद्यपदार्थ फारसा ओळखीचा नव्हता. या देशाला चीझचा परिचय अगदी अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे काही दशकांपूर्वीच झाला. पण आता हा पदार्थ कोरियन खाद्यसंस्कृतीमध्ये असा सामावला आहे, की या पदार्थाला समर्पित थीम पार्क येथे तयार करण्यात आले आहे. कोरिया देशामध्ये चीझचे आगमन झाले १९५८ सालामध्ये. जेओलाबुक-दु प्रांतामध्ये असलेल्या इम्सील गावामध्ये एक ख्रिश्चन धर्मगुरू बेल्जियम देशामधून राहावयास आले. आपल्या छोट्याश्या घरामध्ये या धर्मगुरूंनी काही शेळ्या पाळल्या, आणि त्यांच्या पासून मिळणाऱ्या दुधापासून चीझ बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर इम्सील गावाच्या प्रमुखाने धर्मगुरूंना चीझ बनविण्याचे प्रशिक्षण गावकऱ्यांना देण्याची विनंती केली. अश्या रीतीने चीझ बनविण्याची परंपरा येथे सुरु झाली आणि इम्सील गावाला कोरियातील ‘चीझचे माहेरघर’ म्हणून ओळख प्राप्त झाली.
theme-park1
इम्सील या ठिकाणची खासियत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीझला समर्पित, ‘इम्सील चीझ थीम पार्क’चे निर्माण या ठिकाणी २००४ साली करण्यात आले. या ठिकाणी येऊन चीझचे अनेकविध प्रकार, ते बनविले जाण्याची प्रक्रिया, आणि ते प्रत्यक्षात बनविले जाताना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. तसेच येथे शेळी पालन मोठ्या प्रमाणावर केले जात असून, याठिकाणी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी प्ले पार्क देखील आहे. तसेच या मोठ्या पार्क मध्ये ठिकठीकाणी मुलांच्या आवडत्या कार्टून्सचे मोठे पुतळे देखील उभारले गेले आहेत.
theme-park2
या पार्कची खासियत आहे येथील ‘चीझ एक्सपीरीअन्स सेंटर’. या ठिकाणी पर्यटकांना स्वतः चीझ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येते. तसेच या ठिकाणी दुधावर प्रक्रिया करणारी एक फॅक्टरी, चीझचे मनपसंत प्रकार खरेदी करता येण्यासाठी एक स्टोर आणि दोन रेस्टॉरंटस् आहेत. तसेच चीझचे अनेकविध प्रकार बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रक्रिया विकसित करणारी एक प्रयोगशाळा देखील या ठिकाणी पहावयास मिळते.

Leave a Comment