हा आहे जगातील सर्वात भव्य आईस फेस्टिव्हल.

ICE
गेली पस्तीस वर्षे चीनमध्ये ‘आईस अँड स्नो फेस्टिव्हल’ साजरा होत आहे. जगभरातून हजारो पर्यटक या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. हिवाळ्याच्या ऋतूची खासियत असणारा हा उत्सव चीनमधील हार्बिन शहरामध्ये दरवर्षी साजरा होत असतो. हिवाळ्याच्या ऋतूचे आगमन होताच चीनमधील हेईलोंगजियांग प्रांत पर्यटकांच्या गर्दीने गजबजू लागतो. संपूर्ण हार्बिन शहराला जत्रेचे स्वरूप येते. येथील मुख्य आकर्षण असते, ‘हार्बिन इंटरनॅशनल आईस अँड स्नो फेस्टिव्हल’.
ICE1
या उत्सवामध्ये चार वेगवेगळ्या ‘थीम्स्’ आयोजित करण्यात येतात. या उत्सवाला यंदाच्या वर्षी पाच जानेवारीपासून सुरुवात झाली असून, हा उत्सव फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु राहणार आहे. या उत्सवासाठी मागील वर्षी सुमारे १.८ कोटी लोकांनी हजेरी लावली असून, यंदाच्या वर्षी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या उत्सवामध्ये ठिकठिकाणी बर्फापासून मोठमोठ्या मूर्ती बनविण्यात येतात. तसेच बर्फ खोदून काढून या ठिकाणी मोठा जलतरणतलावही बनविण्यात येतो.
ICE2
या उत्सवामध्ये चार वेगवेगळी थीम पार्क बनविण्यात येत असून, ही थीम पार्क पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी येथे होत असते. बर्फांपासून बनविलेल्या मोठमोठ्या प्रतिकृती, आईस अँड स्नो वर्ल्ड, बर्फांपासून बनविल्या गेलेल्या मोठ्या प्रकाशदाण्या (lanterns) आणि दिवे इत्यादी गोष्टी या थीम पार्क्समध्ये पहावयास मिळतात. या उत्सवाचे आयोजन करण्याकरिता ७५०,००० स्क्वेअर मीटरपेक्षाही अधिक क्षेत्राची आवश्यकता असून, त्यावरूनच हा उत्सव किती मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो हे आपल्या लक्षात येते. इतकेच नव्हे तर पर्यटकांच्या खानपानाची सुविधा असावी या करिता येथे उपलब्ध करविण्यात आलेली रेस्टॉरंटस् ही बर्फानेच बनविलेली आहेत. अश्या प्रकारचा उत्सव जपानमध्ये ही साजरा केला जात असून, हा उत्सव ‘स्पॅरो फेस्टिव्हल’ या नावाने ओळखला जातो.

Leave a Comment