मुंबई – राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर, काही ठिकाणी लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकाडाउन लागतो की काय? असा प्रश्न पडत आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अन्य शहरांमध्य दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर, आज दिवसभरात राज्यात १५ हजार ८१७ नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर या महामारीमुळे ५६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज १५ हजार ८१७ची वाढ, तर ५६ रूग्णांचा मृत्यू
सध्या राज्यातील मृत्यू दर २.३१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५२ हजार ७२३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण १,१०,४८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज ११,३४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २१,१७,७४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.७९ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आजपर्यंत करण्यात आलेल्या तपासण्यात १,७३,१०,५८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,८२,१९१ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४२,६९३ व्यक्ती गृहविलगीकरणा मध्ये आहेत. तर ४ हजार ८८४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.