व्हिडीओ व्हायरल; ऑर्डर रद्द केली म्हणून झोमॅटो डिलिव्हरी बॉयने महिलेचे फोडले नाक


बंगळुरु – झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने ऑर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप बंगळुरुमधील एका महिलेने केला आहे. आपल्याला घरात घुसून मारहाण झाल्याचे महिलेने सांगितले आहे. मारहाणीनंतर कंटेंट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात त्यांच्या नाकातून रक्त वाहताना दिसत आहे. आपली ही परिस्थिती मारहाणीमुळेच झाल्याचे हितेशाने सांगितले आहे. दरम्यान या घटनेवर झोमॅटोने प्रतिक्रिया दिली असून आमचा स्थानिक प्रतिनिधी तुम्हाला पोलीस तपासात मदत करेल, असे आश्वासन दिले आहे.

रक्तबंबाळ अवस्थेतील आपले नाक हितेशा व्हिडीओमध्ये दाखवत आहे. माझी झोमॅटो ऑर्डर उशिरा डिलिव्हरी झाली आणि मी कस्टमर केअरसोबत बोलत होते, यादरम्यान डिलिव्हरी बॉयने हे कृत्य केले. त्याने मला मारहाण केली आणि मला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळ काढल्याचे हितेशा सांगत आहे.

हितेशाने यानंतर अजून एक व्हिडीओ शेअर केला असून यावेळी तिने नाकाला पट्टी बांधली आहे. ती व्हिडीओत सांगते की, मी सकाळपासून काम करत असल्याने झोमॅटोवरुन जेवण मागवले होते. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास मी ऑर्डर दिली, साडे चार वाजेपर्यंत ऑर्डर येणे अपेक्षित होते. ऑर्डर वेळेत न आल्याने मी वारंवार फोन करत होती. एक तर मला मोफत द्या किंवा मग ऑर्डर रद्द करा, असे मी कस्टमर केअरला सांगत होते.


त्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी बॉय आला. तो खूप उद्धट होता. मी दरवाजा पूर्णपणे न उघडता त्याला आपण कस्टमर केअरशी बोलत असल्याचे सांगितले. आपल्याला ऑर्डर उशिरा आल्याने ती नको असल्याचे मी त्याला सांगितले. त्याने यावेळी नकार देत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मी तुमचा नोकर आहे का ? असे तो सांगत होता. मी खूप घाबरले आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तो दरवाजा ढकलून आतामध्ये आला, माझ्याकडून ऑर्डर खेचून घेतली आणि नाकावर ठोसा मारुन पळ काढला, असे हितेशाने आपल्या चार मिनिटांच्या व्हिडीओत सांगितले आहे.

झोमॅटोने या संपूर्ण प्रकारावर एक निवेदन प्रसिद्ध केले असून संबंधित व्यक्तीला हटवण्यात आल्याची माहिती दिली. झोमॅटोने माफी मागत भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये, यासाठी काळजी घेऊ असे आश्वासन दिले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे.