सनातन परंपरेमध्ये भगवान शंकराची साधना कल्याणकारी मानली गेली आहे. महाशिवरात्रीच्या महापर्वानिमित्त केली गेलेली शिवाची आराधना कष्ट दूर करून प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारी मानली गेली आहे. मानवी शरीर हे पंचतत्वांनी बनलेले असून, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही ती पंचतत्वे आहेत. याच पंचतत्वांना समर्पित अशी काही शिवमंदिरे भारतामध्ये आहेत. येथे साधना केल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. तामिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथे असणारे एकंबरनाथ शिव मंदिर पंचतत्वांच्या पैकी पृथ्वी या तत्वाला समर्पित आहे. भगवान शंकराला सर्वोच्च देवता मानून त्याचे पूजन करणाऱ्यांसाठी हे मंदिर विशेष मानले जाते. या मंदिरामध्ये असलेले शिवलिंग वाळू पासून तयार करण्यात आल्याचे म्हटले जाते. म्हणूनच या शिवलिंगावर कधीही पाण्याचा अभिषेक केला जात नाही. पाण्याचा अभिषेक करण्याच्या ऐवजी केवळ पाण्याचे थेंब शिंपडून येथे अभिषेक केला जाण्याची पद्धत आहे.
तामिळनाडू राज्यातच तिरुचिरापल्ली येथे असलेले जम्बुकेश्वर मंदिर जल या तत्वाला समर्पित आहे. चोला राजवंशाचे राजे कोकेंगानन यांनी या मंदिराचे निर्माण करविले होते. या मंदिराला ‘थिरूवनैकवल’ नावाने देखील ओळखले जाते. या मंदिराच्या बाबतीत सर्वश्रुत असलेली आख्यायिका अशी, की जेव्हा भगवान शंकरांनी देवी पार्वतीला गुप्त स्थानी जाऊन तपश्चर्या करण्यासाठी सांगितले, तेव्हा पार्वतीने कावेरी नदीच्या तटी जांभळांच्या जंगलामध्ये बसून तपस्या केली. ही तपस्या करण्यसाठी पार्वतीने आपली दैवी शक्ती आणि कावेरीच्या जलाने शिवलिंग तयार केले. याच कारणास्तव शिवसाधकांसाठी या मंदिराचा महिमा मोठा आहे. या मंदिराच्या खालून एक जलधारा वाहत असल्याने या परिसरामध्ये पाण्याची कधीही कमतरता भासत नसल्याचे म्हटले जाते.
तमिळनाडू येथील तिरुवन्नामलाई येथे असलेले अरुणाचलेश्वर मंदिर अग्नीला सामार्पित आहे. याच मंदिराला ‘अन्नामलाईयार मंदिर’ या नावानेही ओळखले जाते. सुमारे दहा हेक्टरच्या परिसरामध्ये हे मंदिर विस्तारलेले असून, भारतातील सर्वात विशाल मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरातील शिवलिंगाचा आकार गोलाकार असून, याची उंची तीन फुटांची आहे. या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक अनवाणी येत असतात. अनवाणी चालत येऊन या मंदिरामध्ये दर्शन केल्याने समस्त पापांचे क्षालन होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराचे निर्माण नवव्या शतकामध्ये पल्लव वंशाच्या राजांनी करविले होते. याच राज्यामध्ये चिदंबरम शहरात असलेले नटराज मंदिर आकाश या तत्वाला समर्पित आहे. या मंदिरामध्ये भगवान शंकर नटराजाच्या रूपात विराजमान आहेत. हे मंदिर चेन्नईपासून २४५ किलोमीटरच्या अंतरावर आहे.
वायू या तत्वाला समर्पित असलेले शिवमंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये आहे. तिरुपतीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर काला हस्ती नामक हे मंदिर उंच डोंगरावर स्थित आहे. या मंदिरातील शिवलिंगाची उंची सुमारे चार फुटांची असून, या मंदिरामध्ये शिवलिंगावर जलाभिषेक केला जात नाही. या मंदिराचा महिमा अतिशय थोर असून, या मंदिराचा उल्लेख ‘दक्षिण भारताचे कैलास’ असा ही केला जातो. या मंदिरामध्ये जाताना सोवळी वस्त्रे परिधान करून जाणे भाविकांसाठी अनिवार्य आहे.