महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्र सरकारही चिंतेत


नवी दिल्लीः एकीकडे देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना दुसरीकडे देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहेत. त्यातच विशेष करून महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाला सहजतेने घेऊ नका, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. अतिशय झपाट्याने महाराष्ट्रातील कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल म्हणाले.

व्ही. के. पॉल यांनी एका पत्रकार परिषदेत देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीसंदर्भात माहिती दिली. आम्ही महाराष्ट्राबाबत फार चिंतेत आहोत. महाराष्ट्रात वाढत असलेला प्रादुर्भाव हा गंभीर प्रश्न असून कोरोना प्रादुर्भावाला सहजतेने घेऊ नका. तसेच देशाला कोरोनामुक्त करायचे असेल तर कोरोना संबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागेल, असे व्ही. के. पॉल म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे हा प्रादुर्भाव वाढत असल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. हा प्रादुर्भाव चाचण्यांमध्ये आलेली कमी, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा आणि त्यांचा शोध घेण्यात येणाऱ्या उणीवामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले.

देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ लाखाच्यावर गेली आहे. मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या राज्यांसोबत आम्ही बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या सर्व राज्यांनी कंबर कसून मैदानात उतरावे, असे आम्ही सांगितल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

महाराष्ट्रात कोरोनाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रादुर्भावामुळे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यानुसार नागपुरात १५ ते २१ मार्च पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. भाजीपाला, फळ दुकाने, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मात्र सुरूच राहतील. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक भागांमध्ये लॉकडाउन लावण्याचा इशारा दिला आहे.