अचानक शरद पवारांच्या भेटीला हार्दिक पटेल


मुंबई : आज मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष व पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसला गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आपली नाराजी पटेल यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या पवार भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

आज सकाळी शरद पवार यांची हार्दिक पटेल यांनी भेट घेतली. सुमारे २० मिनिटे त्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. गुजरातपासून मुंबईपर्यंत या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील मिळाला नसला तरी गुजरातमधील सध्याची राजकीय स्थिती, पुढच्या वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका, आरक्षण हे मुद्दे चर्चेत होते, असे कळते.

मुंबईत दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने ते प्रकरण सध्या गाजत आहे. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. याबाबत एक ट्वीट करून हार्दिक यांनी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते व भाजपवर टीका केली होती. याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नुकत्याच गुजरातमधील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या. भाजपचा त्यात मोठा विजय झाला आहे, तर काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. या निकालांनंतर गुजरात काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे. त्यात कार्याध्यक्ष असलेल्या हार्दिक पटेल यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

माझ्या नेतृत्वाला काँग्रेसकडून गुजरातमध्ये योग्य संधी दिली गेली नाही. पालिका निवडणुकीत माझी एकही सभा घेतली गेली नाही आणि पक्षाच्या कोणत्याच प्रमुख नेत्याने मला प्रचारासाठी बोलावले नाही, अशा शब्दांत पटेल यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. पटेल यांनी या पार्श्वभूमीवर घेतलेली शरद पवारांची भेट अधिक महत्त्वाची ठरली आहे.

हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत का?, काँग्रेसची साथ सोडून हार्दिक पटेल गुजरातेत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार का?, असे प्रश्नही यानिमित्ताने चर्चिले जाऊ लागले आहेत. हार्दिक यांनी पवार यांच्या भेटीआधी आमदार रोहित पवार यांचीही भेट घेतली होती, असे सांगण्यात येत आहे.