MPSCच्या परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ पुण्यातील विद्यार्थी उतरले रस्त्यावर!


पुणे – १४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांनी नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला रास्तारोको केला होता. पण एका बाजूची वाहतूक पोलिसांनी सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणे हे चूक असून हा निर्णय सरकारने तातडीने बदलायला हवा. या परीक्षा होण्याआधीच ३ दिवस आधी पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

पुण्यात MPSC च्या परीक्षांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. पण ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.

एमपीएससीकडून १४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यामध्ये नव्या तारखा यथावकाश जाहीर केल्या जातील, असे म्हटल्यामुळे नेमक्या परीक्षा पुन्हा कधी होणार? याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे.