४०० कोटींच्या स्मारकाऐवजी बाळासाहेबांच्या नावाने रुग्णालय उभारा; इम्तियाज जलील


औरंगाबद – एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजुर झालेली ४०० कोटींची रक्कम रुग्णालय उभारण्यासाठी वापरावी आणि रुग्णालयाला त्यांचं नाव द्यावं, असा सल्ला दिला आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. इम्तियाज जलील यांनी या घोषणेनंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

४०० कोटी रुपये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी खर्च करण्यापेक्षा प्रत्येकी १०० कोटी खर्चून राज्यात ४ मोठी रुग्णालये त्यांच्या नावाने सुरू करता येतील, असे इम्तियाज जलील म्हणाले. बाळासाहेबांचे नाव रुग्णालयांना दिले, तरी आमची काही हरकत नाही. जनतेला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची गरज असल्याचेही जलील पुढे म्हणाले.