तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री: आजच होणार शपथविधी!


डेहराडून – तीरथ सिंह रावत यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षातील अंतर्गत विरोधामुळे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. हा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपालांकडे शपथविधीसाठी आजच संध्याकाळी 4 वाजताची वेळ मागण्यात आली आहे. अर्थात आजच नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

पौडी गढवाल येथे जन्मलेले तीरथ सिंह रावत सध्या पौडी लोकसभा मतदार संघातून खासदार आहेत. ते उत्तर प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुद्धा होते. त्यांनी 1997 मध्ये उत्तर प्रदेशातून आमदारकी मिळवली होती. ते उत्तराखंड सरकारमध्ये शिक्षण मंत्री सुद्धा होते. तीरथ सिंह रावत भाजपचे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 9 फेब्रुवारी 2013 ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद भूषविले. तत्पूर्वी चौबटखल विधानसभा मतदार संघातून ते 2012 ते 2017 पर्यंत आमदार होते. ते सध्या भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत.

भाजपने आमदार गटाच्या बैठकीचे आपले राष्ट्रीय उपाध्यक्ष रमन सिंह तसेच सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम यांना पर्यवेक्षक केले आहे. आजच दोन्ही नेत्यांना डेहराडूनला बोलावण्यात आले आहे. तत्पूर्वी या दोघांना शनिवारी भाजपने निरीक्षक बनवून उत्तराखंडमध्ये पाठवले होते. दोघांनी एक रिपोर्ट तयार करून भाजप मुख्यालयात पाठवला होता. तसेच राज्यातील मंत्री आणि आमदार सरकारचा चेहरा बदलण्याची मागणी करत आहेत असे सांगितले होते. मुख्यमंत्री नाही बदलल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला नुकसान होईल असेही या अहवालात सांगण्यात आले होते.