दिलेला शब्द राहुल गांधींनी पाळला, 12 वर्षांच्या मुलाला पाठवले स्पोर्ट्स शूज!


कन्याकुमारी : आपल्या एका छोट्या चाहत्याचे मन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जिंकले आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये निवडणूक प्रचारात राहुल गांधी व्यस्त आहेत. तामिळनाडूत प्रचार करताना कन्याकुमारीमध्ये राहुल यांची भेट अँटनी फ्लेक्स या 12 वर्षाच्या मुलासोबत झाली होती. राहुल यांनी या भेटीत त्याला मदत करण्याचे वचन दिले होते आणि ते त्यांनी पूर्ण देखील केले आहे.

काही दिवसांपूर्वी कन्याकुमारीमध्ये रस्त्याच्या बाजूला एका ठिकाणी राहुल गांधी चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यावेळी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांचा फोटो घेऊन उभ्या असलेल्या फ्लेक्सला पाहिले. राहुल फ्लेक्सशी गप्पा मारु लागले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की फ्लेक्सने पायात काहीही घातलेले नाही. या छोट्याश्या भेटीत आपल्याला पळायला आवडते हे देखील त्याने राहुल गांधींना सांगितले.

त्याचबरोबर आपण 100 मीटरच्या शर्यतीमधील चांगले रनर असल्याचेही फ्लेक्स राहुल यांना सांगितले होते. त्यावेळी राहुल यांनी फ्लेक्सला पळायला सोपे जावे म्हणून स्पोर्ट्स शूज देण्याचे वचन दिले. त्याचबरोबर त्याला स्पोर्ट्स अकादमीमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राहुल गांधी यांनी फ्लेक्सशी आहार ते प्रॅक्टीसपर्यंतच्या अनेक विषयावर गप्पा मारल्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून देशाचे नाव उंच कर, असा आशीर्वाद देखील त्याला दिला. त्याचबरोबर ‘रोड शो’ मध्ये सहभागी होण्यापूर्वी राहुल त्याच्या घरी देखील गेले होते. आता राहुल यांनी आपले हे आश्वासन पूर्ण करत फ्लेक्सला स्पोर्ट्स शूज पाठवले आहे.