महाविकास आघाडी सरकारचा सचिन वाझेंबद्दल मोठा निर्णय


मुंबई – सध्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विरोधकांच्या निशाण्यावर असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली होणार असून विधान परिषदेत ही घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. अनिल देशमुख विधान परिषदेत कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी यावेळी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन इतर ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पण विरोधक अटकेच्या मागणीवर ठाम असून यावेळी सभागृहात झालेल्या गदारोळानंतर कारवाई स्थगित करण्यात आली.

निवदेनाच्या सुरुवातीला अनिल देशमुख यांनी राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. पण विरोधकांनी यावरुन गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार का, अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले की, सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांचमध्ये जिथे ते कार्यरत आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा अनिल देशमुख यांनी केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.