अर्थसंकल्प राज्याचा; इस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे नाव


मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात अजित पवार यांनी अनेक रस्ते मार्गांसाठी मोठ्या निधीची घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव मुंबईतील ईस्टर्न फ्री वेला देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे. पत्राद्वारे ही मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

अस्लम शेख यांची मागणी मान्य करत स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव आता ईस्टर्न फ्री वेला दिले जाणार आहे. मुंबईची वाहतूक कोंडी लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्ण मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. हा मार्ग विलासराव देशमुख यांच्यामुळेच तयार होऊ शकला, त्यामुळे या मार्गाला आता विलासराव यांचे नाव दिले जाणार आहे.