गाईच्या गोवऱ्यांवर आहूती दिल्याने घर राहते १२ तास सॅनिटाईज; भाजप नेत्याचा अजब दावा!


इंदूर – कोरोनाचे देशावर ओढावलेल्या संकटाला १ वर्ष पूर्ण झाले असून अद्यापही यावर म्हणावे तसे कोणतेही उपचार सापडलेले नाहीत. देशात सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू झाले असले तरी प्रादुर्भावाचा वेग तसाच आहे. वेगवेगळ्या स्तरातून कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशाच आता कोरोनचा प्रसार रोखण्यासाठी एका भाजप मंत्र्याने वैदिक उपचारांबाबत एक अजब दावा केला आहे.

कोरोनापासून बचावासाठी वैदिक पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला मध्यप्रदेशातील संस्कृती आणि अधात्ममंत्री उषा ठाकूर यांनी दिला आहे. याव्यतिरिक्त त्यांनी सुर्योदय आणि सुर्यास्ताच्यावेळी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांवर तुपाने आहूती दिल्यास १२ तासांपर्यंत घर संक्रमणमुक्त आणि सॅनिटाईज राहू शकते, असे म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, गाईच्या दुधापासून बनलेल्या तुपात तुम्ही अक्षता मिसळून ठेवून द्या. सर्योदय आणि सुर्यास्ताच्यावेळी गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांवर आहूती द्या. यावेळी अक्षता मिसळलेल्या तुपाचा वापर करा. यामुळे १२ तासांपर्यंत घर सॅनिटाईज राहायला मदत होईल.

५५ वर्षीय ठाकूर म्हणाले की, माझे शब्द लोकांना विचित्र वाटू शकतात, पण घराला संसर्गमुक्त ठेवण्याची ही कृती मनावर घ्यायला हवी. हे विज्ञान आहे की जेव्हा भगवान सूर्य उगवतात किंवा आकाश वर बसतात तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती २० पटीपर्यंत वाढते. संध्याकाळी (वातावरणात) ऑक्सिजन कमी प्रमाणात असतो, जर या वेळी आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन हवा असेल तर तुपाच्या आहूतीमुळे वातावरण चांगले राहते.