महिला दिनाच्या निमित्ताने परिणिती चोप्राच्या सायनाचा ट्रेलर रिलीज


भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालच्या बायोपिकची मागच्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री परिणिती चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या ‘सायना’ बायोपिकचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्यात सायना नेहवालच्या बालपणापासून ते ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास थोडक्यात दाखवण्यात आला आहे.

ट्रेलरची सुरुवात सायनाच्या आईपासून होते. अभिनेत्री मेघना मलिक यांनी या चित्रपटात सायना नेहवालच्या आईची भूमिका साकारली आहे. त्या अस्सल हरियाणवी उच्चारात लहानग्या सायनाला बॅडमिंटनपटू होण्याची स्वप्न दाखवत डायलॉग बोलताना दिसत आहेत. त्यानंतर सुरू होतो, सायनाचा बॅडमिंटन स्टार होण्याचा प्रवास आणि संघर्ष. अनेक दृश्यामध्ये परिणिती चोप्रा तिच्या नेहमीच्या बोलक्या अंदाजात नाही तर एकदम साध्या भोळ्या मुलीसारखी दिसत आहे. मानव कौल यांनी सायना नेहवालचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची भूमिका साकारली आहे आणि नेहमीप्रमाणेच त्यांचा अभिनय उत्तम आहे.

प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी ‘सायना’ बायोपिकचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला अमाल मलिक यांनी संगीत दिले आहे. याआधी अमाल यांनी ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठीही संगीत दिले होते. टी सायना बायोपिकची निर्मिती सीरिजचे भूषण कुमार, कृष्ण कुमार, सुजय जयराज आणि रासेश शाह यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या २६ मार्चला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.