महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप, एकाच दिवशी आढळले 11 हजार बाधित


मुंबई : देशात आणि राज्यात मागील काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये पुन्हा सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर राज्याने नियंत्रण मिळवले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाने आपले डोके पुन्हा वर काढले असून काल म्हणजेच रविवारी एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 11,141 रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली असून ती 97,983 एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52,478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच 11 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान शहरातील सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणण्यात आली आहे. या दरम्यान लग्न समारंभावरही बंदी आणण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात 4264 एवढ्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. राज्यात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येचा दर हा 93.17 एवढा आहे, तर मृत्यू दर हा 2.36 एवढा आहे.

राज्यात कोरोनाबाधितां संख्या ही 22,19,727 एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 52,478 लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचे 1,361 रुग्ण सापडले असून शहरातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 3,35,569 एवढी झाली आहे.