केंद्रीय पथकाचा अहवाल; कोरोनाचा प्रादुर्भाव लोकल, सार्वजनिक कार्यक्रमांमुळे वाढला


मुंबई : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट कमी होत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात आणि मुंबईत वेगाने सुरु झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी नियंत्रणात आलेली असतानाच पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचे प्रमाण झपाट्याने का वाढू लागले? याची पाहणी केंद्र सरकारच्या पथकाने केली. कोरोना संपला असे समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु करणे अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे मत केंद्रीय पथकाने पाहणीनंतर नोंदवलेले आहे.

विशेष म्हणजे कोरोनाचा फैलाव लोकलमधील गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे केंद्रीय पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे. आता आरोग्य यंत्रणा देखील खुप गांभीर्याने काम करत नसल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केले आहे. 1 आणि 2 मार्च रोजी हा कोरोना पाहणी दौरा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपुण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने केला.

कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना त्यावर लवकर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. राज्य सरकारने त्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे, रुग्णांचा शोध घ्यावा, कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन केले पाहिजे, अशा सूचना केंद्रीय पथकाने केल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा आणि लसीकरण सुरू ठेवावे, असेही केंद्रीय पथकाने सुचवले आहे.