मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून भाजप तालुकाध्यक्षांचा जावयावर खुनी हल्ला


श्रीरामपूर – मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून नेवासे येथे नऊ जणांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खेडकर यांनी मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन काही गुन्हेगार सोबत आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.

भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, हृषीकेश खेडकर, प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे यांच्याविरुद्ध प्रेमविवाह केलेल्या प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे बीड जिल्ह्यातील शिरूर येथील असून त्यांच्याकडून एक मोटार, एक पिस्तूल, एक एअरगन, चाकू, गुप्ती आदी हत्यारे जप्त केली आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. माणिक खेडकर, त्यांचा चुलत भाऊ व हृषीकेश खेडकर हे फरार आहेत.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नेवासा महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी बंटी उर्फ प्रशांत राजेंद्र वाघ यांचे व लातूरला बीएएमएसच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या पाथर्डीतील ऋतुजा माणिक खेडकर यांचे प्रेम होते. आंतरजातीय विवाहाला घरच्यांनी विरोध केला होता. ऋतुजा व बंटी यांनी त्याला न जुमानता एक मार्च रोजी विवाह केला. विवाहाला विरोध असल्याने वडील खेडकर यांनी जावई बंटी याला धमकी दिली होती. नेवाशातील कडूगल्लीत दुपारी बंटी याच्या घरी चार वाहनातून खेडकर हे लोक घेऊन आले. त्यांनी वाघ कुटुंबीयांना मुलगी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. नंतर एकाने बंटी याच्यावर गुप्तीने हल्ला केला. पण त्याने वार चुकविला. बंटी याने आरडाओरडा केला. त्यावेळी एकाने त्याच्यावर पिस्तूल रोखले. हा गोंधळ सुरू असताना गल्लीत लोक जमा झाले. काहींनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. जमाव जमल्यानंतर आरोपी पळून गेले.

नेवाशातून जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी त्वरित नाकेबंदी केली. तसेच स्वत: दुचाकीवर आरोपीचा पाठलाग केला. शेवगाव रस्त्यावर भानसहिवरा शिवारात तीन मोटारीसह सात जणांना ताब्यात घेतले. नेवासे पोलीस ठाण्यात या प्रकरणी बंटी उर्फ प्रशांत वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे करीत आहेत.