तुमचा चेहरा तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो?

Face

आपला चेहरा आपल्या आरोग्याचा आरसा म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना त्याच्या चेहऱ्यावरून करता येऊ शकते. तसेच एखाद्याच्या मनावर असलेला ताणही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या खुणांनी सहज लक्षात येतो. आपला चेहरा आपल्या आरोग्याच्या बाबतीत काय सांगत असतो, हे जाणू घेऊ या. जर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसून आल्या, तर ही व्यक्ती सतत उन्हामध्ये बाहेर पडत असल्याचे ओळखावे. अशा व्यक्तीच्या चेहऱ्यावर, डोळ्यांच्या भोवती बारीक सुरकुत्या दिसून येऊ लागतात. या सुरकुत्या टाळण्यासाठी सतत उन्हामध्ये फिरणे टाळावयास हवे. जर हे करणे शक्य नसेल, तर उन्हामध्ये बाहेर पडताना छत्री असावी. डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे या त्वचेला संरक्षण देणारा गॉगल डोळ्यांवर अवश्य असावा. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर सर्वांनी जरूर करावा.

Face1
जर चेहऱ्यावर सतत हलकी सूज दिसत असेल, तर हे शरीरामध्ये अतिरिक्त पाणी साठत असल्याचे म्हणजेच फ्लुइड रीटेन्शनचे लक्षण आहे. फ्लुइड रीटेन्शनसाठी अनेक कारणे असू शकतात. युरिनरी ट्रॅक्ट सिस्टममध्ये असणारा बिघाड, किडनीच्या कार्यामध्ये असणारा बिघाड, अनियमित, असंतुलित आहार आणि अपुरी झोप इत्यादी कारणे यामागे असू शकतात. यासाठी त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन आवश्यक ती उपाययोजना करणे अगत्याचे असते. जर गालांवरील त्वचा खूपच कोरडी पडू लागली, तर हे लक्षण आपला आहार असंतुलित असल्याचे आहे. त्याचप्रमाणे पाणी कमी प्यायले जात असल्याने त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळत नसल्यानेही गालांवरील त्वचा कोरडी पडू लागते. अशा वेळी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून आपला आहार संतुलित असेल याची दक्षता घ्यावी.

Face2
काही व्यक्तींच्या कपाळावरील, हनुवटीवरील आणि गालांवरील त्वचा सतत लालसर दिसते. रक्तकोशिकांच्या बाबतीत असणाऱ्या समस्या, तापमानामध्ये अचानक झालेले बदल, हृदयाशी निगडीत समस्या, धुम्रपान इत्यादी कारणे या मागे असू शकतात. यासाठी आवश्यक त्या तपासण्या करून घेऊन जरूर असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरु करणे गरजेचे असते. चेहऱ्यावर सतत मुरुमे-पुटकुळ्या येत असणे हे हार्मोन्सचे असंतुलन, आहारामध्ये साखरयुक्त आणि चरबीयुक्त (fatty) पदार्थ अधिक असल्याचे लक्षण आहे. तसेच सतत फिकट दिसणारा चेहरा शरीरामध्ये लोहाची कमतरता व अॅनिमियाचे लक्षण असू शकतो. डोळ्याच्या खाली सूज आणि काळी वर्तुळे अपुरी झोप, सातत्याने धूम्रपान किंवा मद्यपान आणि मानसिक तणावाची सूचक आहेत. सतत ओठ कोरडे असणे किंवा ओठाच्या कडांना चिरा पडणे ही शरीरातील लोह, झिंक, अ, ब, क, इ आणि ड जीवनसत्वांची कमतरता दर्शवितात. यासाठी आपल्या आहारामध्ये भरपूर ताजी फळे आणि भाज्या समाविष्ट कराव्यात तसेच आवश्यकता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्सही घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment