रहस्य ‘पॉम्पेई लक्ष्मी’चे

laxmi
७९ व्या शतकामध्ये माउंट वेसुवियसचा उद्रेक झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर पडलेल्या ‘व्होलकॅनिक अॅश’, म्हणजेच ज्वालामुखीतील राखेखाली उत्तरी इटलीतील कॅम्पेनिया प्रांतातील पॉम्पेई झाकले गेले. त्यानंतर सुमारे दोन हजार वर्षांनी प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांच्या शोधामध्ये असलेल्या पुरातत्ववेत्त्यांसाठी पॉम्पेई हे अतिशय महत्वाचे स्थान ठरले. पॉम्पेई येथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये तिथे सापडलेल्या एक लहानशा मूर्तीने पुरातत्ववेत्त्यांचे लक्ष वेधून घेतले. पंचवीस सेंटीमीटर उंचीची ही हस्तिदंती मूर्ती होती लक्ष्मी या हिंदू देवतेची. एका लाकडी संदुकीमध्ये इतरही अनेक वस्तूंच्या जोडीने ही मूर्ती सापडली. ही मूर्ती पॉम्पेई येथे सापडल्याने या लक्ष्मीच्या मूर्तीला ‘पॉम्पेई लक्ष्मी’ असे नाव देण्यात आले. पण विचाराचा मुद्दा असा, की एका हिंदू देवतेची मूर्ती इतक्या दूरवरच्या प्रांतामध्ये पोहोचली कशी?
laxmi1
सध्या नेपल्स येथील राष्ट्रीय वास्तुसंग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली पॉम्पेई लक्ष्मीची मूर्ती, पॉम्पेई येथे सापडलेल्या अनेक मूल्यवान वस्तूंपैकी एक आहे. पॉम्पेईच्या उत्खननात सापडलेले मानवी अवशेष आणि इतरही अनेक वस्तूंवरून या प्राचीन रोमन शहरातील आयुष्य एके काळी कसे असावे, याची कल्पना करता येऊ शकते. लक्ष्मीच्या या मूर्तीला पॉम्पेई लक्ष्मी असे म्हटले जात असले, तरी अनेक पुरातत्ववेत्त्यांच्या मतानुसार ही मूर्ती लक्ष्मीची नसून एका यक्षीची आहे. हिंदू पुराणांमध्ये यक्ष आणि यक्षींचे अनेक उल्लेख सापडतात. लक्ष्मीच्या प्रतिमेशी साधर्म्य असणारी अनेक चिन्हे या मूर्तीमध्येही आहेत. अशी ही मूर्ती इथे सापडली कशी, आणि ती नेमकी इथवर आली कशी, याचा इतिहास मोठा रोचक आहे.
laxmi2
पॉम्पेईच्या उत्खाननामध्ये ही मूर्ती १९३८ साली सापडली. त्याकाळी ‘कासा डे क्वात्त्रो’च्या भागामध्ये उत्खननाचे कार्य सुरु होते. या ठिकाणी एका प्राचीन वास्तूच्या अवशेषांमध्ये सापडलेल्या एका लाकडी संदुकीमध्ये ही मूर्ती सापडली. त्याकाळी भारत आणि रोम देशांमधून अनेक वस्तूंची आयात-निर्यात होत असे. याच देवघेवीच्या माध्यमातून ही मूर्ती पॉम्पेईपर्यंत पोहोचली असल्याचा पुरातत्ववेत्त्यांचा अंदाज आहे. पॉम्पेई लक्ष्मीची ही मूर्ती वस्त्रविरहित असून, या मूर्तीच्या कंबरेवर कोरला गेलेला कंबरपट्टा, हातामध्ये बांगड्या आणि त्याचबरोबर इतरही अनेक सुंदर आभूषणे परिधान केली असल्याचे पहावयास मिळते. या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना कोरलेल्या दोन लहान मूर्ती लक्ष्मीच्या सेविका असल्याचे म्हटले जाते. ही मूर्ती उत्खननामध्ये सापडली, तेव्हा ही भग्न झालेली होती. पुरातत्ववेत्त्यांनी मोठ्या कष्टाने या मूर्तीचा एक एक तुकडा जोडून ही मूर्ती पुन्हा तयार केली आहे.
laxmi3
ही मूर्ती कोणी बनविली याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसली, तरी काही पुरातत्ववेत्यांच्या मतानुसार ही मूर्ती मथुरा येथे बनविली गेली आहे, पण बहुतेक पुरातत्ववेत्त्यांच्या मतानुसार ही मूर्ती महाराष्ट्रातील भोकरदान (आताचे जालना) येथील आहे. त्याकाळी या प्रांतावर सातवाहनांचे आधिपत्य असून, या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये पुरातत्ववेत्त्यांना पॉम्पेई लक्ष्मीच्या मूर्तीसारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या काही मूर्ती सापडल्याचे समजते. मात्र पॉम्पेई लक्ष्मीच्या मूर्तीवर ‘खारोस्थी’ लिपीतील अक्षरे असून, ही लिपी मूळची गांधार प्रांतातील असल्याचे म्हटले जाते. सातवाहनाच्या काळामध्ये होत असणाऱ्या व्यापाराच्या द्वारे ही मूर्ती समुद्रमार्गे रोममध्ये पोहोचली असावी असा तज्ञांचा कयास आहे.

Leave a Comment