मुघल सम्राटांच्या अशा होत्या खानपानाच्या सवयी

food
मुघल सम्राटांच्या खानपानाच्या बाबतीत अनेक नियम पाळले जात असत. सर्वप्रथम त्यांना वाढल्या जाणाऱ्या भोजनाचे सेवन त्यांच्या विश्वासातील एका अधिकाऱ्याला करावे लागत असे. मुघल सम्राटांना अन्नामधून विष तर दिले जात नाही याची खात्री करण्यासाठी ही प्रथा होती. अधिकाऱ्याने भोजन ग्रहण केल्यानंतर काही वेळाने अन्न सुरक्षित घोषित केले जाई, आणि मगच हे अन्न सैनिकांच्या कडक पहाऱ्यामध्ये सम्राटांना पेश केले जात असे. सम्राटांच्याकडे कोणी पाहुणे मंडळी भोजनास असतील, तर त्यांच्या हुद्द्यानुसार त्यांना पदार्थ वाढले जात असत. या आणि अशा अनेक खाद्य-परंपरा मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांच्या काळापासून ते औरंगझेबाच्या वेळेपर्यंत रूढ झाल्या. आज भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोकप्रिय असणारे अनेक पदार्थ मुघल साम्राज्यामुळेच येथे आले आणि रुजले. मुघल साम्राज्यामध्ये खानपानाच्या बाबतीतले नियम जरी सर्वसाधारणपणे सर्वांनाच लागू असले, तरी या नियमाच्या व्यतिरिक्त काही सम्राटांच्या स्वतःच्या खानपानाच्या बाबतीत काही खास सवयी होत्या.
food1
अकबराला हिंदू राण्या असल्याने अकबराच्या काळामध्ये मुघल खाद्यसंस्कृतीमध्ये अस्सल भारतीय पदार्थ समाविष्ट केले जात असत. अकबराने शाकाहाराचा स्वीकार केला असल्याने आठवड्यातून तीन दिवस तो केवळ शाकाहारी भोजन घेत असे. अकबराच्या काळी अस्तित्वात असलेल्या मुदपाकखान्यामध्ये (स्वयंपाकघरामध्ये) गुलाबजल शिंपडले जाण्याची पद्धत होती. त्यामुळे तिथे भरून ठेवलेल्या अन्न-धान्याला गुलाबजलाचा सुगन्ध येत असे. अकबर दिवसातून एकदाच भोजन करीत असून, नंतरच्या काळामध्ये अकबराने संपूर्ण शाकाहाराचा स्वीकार केला होता. अकबर पाणी म्हणून केवळ गंगाजलाचे सेवन करीत असून, या पाण्यामध्ये सर्व रोग बरे करण्याची ताकद असल्याचा त्याचा विश्वास होता.
food2
शाहजहानला मसालेदार पदार्थ मनापासून आवडत असत. मद्यपान मात्र तो अतिशय मर्यादित प्रमाणात करीत असे. शाहजहान केवळ यमुना नदीचे पाणीच पीत असे. इतकेच नव्हे तर तो खात असलेले अन्न देखील यमुनेच्या पाण्यामधेच शिजविले जात असे. शाहजहानला ताजी फळे अतिशय प्रिय असून, आंबा हे त्याचे सर्वाधिक आवडते फळ होते. औरंगझेब हा शेवटचा अतिशय बलशाली समजला जाणारा मुघल सम्राट ठरला. हा अतिशय कट्टरपंथी असून, शाकाहारी होता. ‘कुबूली’ नावाचा भाताचा प्रकार औरंगझेबाला अतिशय प्रिय होता. तुरीची डाळ, तांदूळ, जर्दाळू, तुळशीची पाने आणि बदाम घालून हा भात तयार केला जात असे.
food3
बाबरचे पुत्र आणि अकबराचे पिता हुमायून यांचे, त्यांच्या जीवनातील पुष्कळ वर्षे इराणमध्ये वास्तव्य होते. त्यामुळे तेथील खाद्यपरंपरा त्यांच्या जास्त परिचयाची आणि आवडीची होती. त्यामुळे तत्कालीन मुघल खाद्यसंस्कृतीवर पर्शियन छाप जास्त होती. हुमायूनला डाळ-तांदुळाची खिचडी देखील अतिशय प्रिय होती. जहांगीर हा मुघल सम्राट मद्याचा मोठा शौकीन होता. इतकेच नव्हे, तर अफीमचे ही त्याला व्यसन होते. या व्यसनांच्या तो इतका जास्त आहारी गेला होता, की अनेक वेळा त्याला दरबारातून किंवा त्याच्या महालातून उचलून आणावे लागत असे. जहांगीरही केवळ यमुना नदीचेच पाणी पीत असे. खाण्या-पिण्याच्या बाबतीत त्याच्या विशेष आवडीनिवडी नव्हत्या.
food4
भारतामध्ये आल्यानंतर बाबर समरकंद येथून भाज्या आणि फळे मागवीत असे. भारतामध्ये आल्यानंतर त्याला सर्वात जास्त पसंत पडलेली गोष्ट ही, की येथे फळे, भाज्यांच्या सोबतच ताजे सागरी मासे आणि गोड्या पाण्यातील मासे सदैव, मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असत. बाबर मद्यपान करीत असला तरी आठवड्यातील तीन दिवस तो मद्याला स्पर्शही करीत नसे.

Leave a Comment