हिंदू धर्मामध्ये शंखाला अतिशय पवित्र आणि शुभफलदायी मानले गेले आहे. पुराणांच्या अनुसार शंखाची उत्पत्ती समुद्रातून झाली असल्याची मान्यता आहे. देव आणि असुरांमध्ये झालेल्या समुद्रमंथनामध्ये समुद्रातून निघालेल्या चौदा रत्नांमधील शंख हे सहावे रत्न आहे. विष्णुपुराणानुसार लक्ष्मी समुद्राची पुत्री असून, शंख तिचा भाऊ मानला गेला आहे. म्हणूनच ज्या घरामध्ये शंखाची पूजा होते, तिथे लक्ष्मीचा वास सदैव असल्याची मान्यता आहे. हिंदू धर्मामध्ये सर्व मंगल कार्ये, विवाहविधी, धार्मिक अनुष्ठाने, आणि काही घरांमध्ये दररोज पूजेच्या वेळी शंखनाद करण्याची प्रथा रूढ आहे.
घरामध्ये देवघरात शंखाचे पूजन अतिशय शुभफलदायी मानले गेले आहे. शंखनादाला केवळ धार्मिक नाही, तर वैज्ञानिक महत्व ही आहे. शंखातून येणाऱ्या ध्वनी लहरी सकारात्मक असतात. तसेच शंखवादन करणाऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसांना यामुळे चांगला व्यायाम मिळतो. शंखवादन नियमित करणाऱ्यांच्या बाबतीत दमा, कास प्लीहेशी निगडित विकार, यकृताच्या समस्या अभावानेच उद्भवत नसल्याचे आयुर्वेदामध्ये म्हटले आहे. शंखवादनाचा अनुकूल प्रभाव जननेंद्रिय व शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवरही होत असतो.
शंखनाद मानसिक तणाव दूर करणारा असून, यामुळे कुंडलिनी जागृत करण्याची शक्ती विकसित होते. शंखवादन शुभ मानले जात असले, तरी रात्रीच्या वेळी, संध्याआरतीनंतर शंख वाजविणे अशुभ मानले गेले आहे. तसेच गर्भवती महिलांनी शंखवादन करू नये. त्यामुळे गर्भावर अवास्तव दबाव पडण्याची शक्यता असते. लहान मुलांमध्ये वाणी संबंधी समस्या असल्यास, म्हणजे मुले स्पष्ट उच्चार करू शकत नसल्यास शंखामध्ये पाणी भरून ते मुलाला पाजल्यास या समस्या दूर होत असल्याचे म्हटले जाते.