असा आहे मेहंदीपूरच्या बालाजी मंदिराचा महिमा

manipur
भारतामध्ये अनेक सुंदर, भव्य मंदिरे आहेत. यांपैकी अनेक मंदिरांची ख्याती भारतभर पसरलेली आहे. अनेक मंदिरांशी निगडित नानाविध चमत्कारांच्या कथा सर्वश्रुत असल्याने या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी नेहमीच पहावयास मिळत असते. अशाच मंदिरांमध्ये समावेश आहे मेहंदीपूर येथील बालाजी मंदिराचा. हे मंदिर राजस्थान राज्यातील दौसा जिल्ह्यामध्ये असून, या मंदिरामध्ये पहिल्या प्रथमच दर्शनाला येणाऱ्या भाविकांना येथे मोठे विचित्र दृश्य पहावयास मिळते. ज्या व्यक्तींवर तथाकथित जादूटोणा झाला असेल, किंवा ज्यांना ‘बाहेरची बाधा’ झाली असेल, अशा व्यक्तींना या बाधेपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी या मंदिरामध्ये आणण्याचा प्रघात गेली अनेक दशके सुरु आहे. मेहंदीपूर बालाजीच्या छत्रछायेमध्ये पोहोचताच सर्व नकारात्मक शक्तींचे प्रभाव दूर होत असल्याची येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.

एखाद्याला झालेल्या भूतबाधेचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी त्या व्यक्तीला अतिशय कठोर शिक्षा करण्याचा रिवाज या मंदिरामध्ये आहे. या शिक्षेने घाबरून जाऊन व्यक्तीच्या शरीरामध्ये असलेली नकारात्मक शक्ती नाहीशी होत असल्याचे म्हटले जाते. पण या नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी जशा प्रकारच्या शिक्षा येथे देण्याचा प्रघात आहे, ते पाहून इतरांच्या अंगावर मात्र भीतीने काटा उभा राहतो.

मेहंदीपूर बालाजीच्या मूर्तीच्या छातीमध्ये उजव्या बाजूला एक छिद्र असून, या छिद्रामधून सतत जल स्रवत असते. बालाजीच्या या मंदिरामध्ये एकूण तीन देवता आहेत. एक आहेत बालाजी, दुसरे प्रेतराज, तर तिसरे भैरोबाबा, ज्यांना ‘कप्तान’ या नावाने ही संबोधले जाते. या तीनही देवतांना निरनिराळा प्रसाद अर्पण केला जात असतो. या प्रसादाला ‘दर्ख्व्वास्त’ किंवा ‘अर्जी’ म्हटले जाते. बालाजीला लाडू, प्रेतराजाला भात, आणि भैरोबाबाला काळे उडीद प्रसाद म्हणून अर्पण केला जाण्याची इथे रीत आहे. हा प्रसाद बाधा झालेल्या व्यक्तीला खाण्यास देताच या व्यक्तीमध्ये असलेली नकारात्मक शक्ती तडफडू लागते, आणि त्यानंतर नाहीशी होत असल्याचे येथे येणारे श्रद्धाळू म्हणतात.

बालाजीच्या दर्शनाला येणाऱ्यांसाठी येथे अनेक नियम पाळणे सक्तीचे असते. या मंदिरामध्ये दर्शनाला येण्यापूर्वी एक आठवडा आधीपासून भाविकांना कांदा, लसूण, अंडी, मांस, आणि मद्यपानाचे सेवन त्यागावे लागते. तसेच अन्य कुठल्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर मिळालेला प्रसाद जसा भाविक घरी घेऊन जातात, तसा या बालाजी मंदिरामधील प्रसाद मात्र घरी नेण्याची परवानगी भाविकांना नाही. तसेच दर्शन केल्यांनतर घरी परतताना येथील कोणताही खाद्यपदार्थ भाविकांच्या जवळ असणार नाही याची खबरदारी घेणे भाविकांसाठी बंधनकारक असते. हे अन्न पदार्थ किंवा येथील प्रसाद घरी नेल्यास घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो अशी मान्यता असल्याने भाविकांना प्रसाद घरी घेऊन जाण्यास मनाई आहे.

Leave a Comment