अनेकदा स्वयंपाक करीत असताना भांड्यामध्ये अन्न करपते, किंवा खाली लागते. त्यामुळे भांडी काळी होतात व क्वचित त्यातून दुर्गंधी देखील येते. तसेच अनेकदा भांडी बाहेरच्या बाजूने देखील काळी, चिकट होतात. अशा वेळी काही उपायांचा अवलंब केल्यास ही काळी झालेली भांडी सहज स्वच्छ करता येतील आणि भांड्यांच्या तळाशी चिकटून राहिलेले पदार्थही सहज साफ करता येतील.
कढईमध्ये भाजी शिजत असताना जर भाजी करपली, किंवा भांड्याच्या तळाला चिकटली, तर ती साफ करण्यासाठी खाण्याच्या सोडाचा वापर हा अतिशय चांगला पर्याय आहे. भाजी कढईतून काढून घ्यावी. त्यानंतर कढईमध्ये पाणी भरून घेऊन पाण्याला उकळी आणावी. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून खाण्याचा सोडा घालवा, व एक लहान चमचा भांडी धुण्याचा लिक्विड सोप व लिंबाच्या रसाचे दोन तीन थेंब घालून हे पाणी दोन ते तीन मिनिटे चांगले उकळू द्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी भांड्यामध्ये पाच मिनिटे राहू द्यावे. पाच मिनिटांनी पाणी ओतून देऊन तारेची घासणी वापरून भांडे साफ करावे. खाण्याच्या सोड्याच्या वापरामुळे भांडे जास्त घासावे लागत नाही.
भांड्यामध्ये तूप कढविल्यानंतर भांडे तळाशी काळे होते आणि चिकटही होते. असे भांडे साफ करताना देखील खायचा सोडा, लिंबू रस आणि लिक्विड डिशवॉशिंग सोपचा वापर करून भांड्याचा काळेपणा आणि चिकटपणा सहज दूर करता येतो. या शिवाय अन्न करपलेल्या भांड्याचा तळ लिंबाने चांगला रगडून घेऊन त्यानंतर त्यामध्ये पाणी उकळून भांडे धुतल्यासही ते चमकते व अन्न करपल्यानंतर भांड्यामधून येणारी दुर्गंधी देखील नाहीशी होते. लिंबा प्रमाणेच कांद्याचा एखादा लहान तुकडा किंवा टोमॅटोचा गर भांड्यामध्ये घालून त्यामध्ये पाणी उकळल्यासही भांडे स्वच्छ होते. भांडे बाहेरून काळे झाले असल्यास ते साफ करण्यास खाण्याचा सोडा, लिंबू रस आणि मिठाचा वापर करावा.