मैत्रीच्या पुढचे पाऊल उचलताना…

friend
एखाद्याशी मैत्री होते, आणि त्यांनतर त्या व्यक्तीचा सहवास आवडू लागतो. आकर्षणही वाढू लागते आणि मैत्रीच्या पुढे जाऊन आणखीही काही भावना आहे अशी जाणीव होऊ लागते. मैत्रीच्या पुढे जाऊन, आपल्या मनातले प्रेम व्यक्त करताना त्यातून दोन निष्पन्न होऊ शकतात. आपल्या मनामध्ये ज्या व्यक्तीच्या विषयी प्रेम आहे, त्या व्यक्तीने नकार दिल्यास मैत्रीचे संबंध देखील संपुष्टात येण्याची शक्यता असते, आणि जर सुदैवाने होकार दिला, तर एका सुंदर नात्याला सुरुवात होते. पण त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेमाची भावना असताना त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेणे ही महत्वाचे ठरते. एकदा त्या व्यक्तीच्या मनाचा थांग लागला, की मग आपल्या भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या जाव्यात याचा विचार करता येतो. त्यामुळे आपल्या भावना व्यक्त करताना काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.
friend1
आपल्या मनामध्ये असलेल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याआधी समोरच्या व्यक्तीच्या मनामध्येही तशाच भावना आहेत किंवा नाही याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. बहुतेकवेळी समोरच्या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यामध्येही तुमच्या विषयीच्या भावना दिसून येत असतात, त्यामुळे वागण्या-बोलण्यातून दिले जाणारे संकेत नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अनेकदा या बाबतीत गैरसमज होण्याचाही संभव असतो. अशा वेळी त्या व्यक्तीची ओळख आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशीही करून द्यावी. त्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होणारे संकेत, तुमच्या मनातील प्रेमभावनेला हिरवा कंदील देणारे आहेत किंवा नाही हे तुमचे जवळचे मित्र-मैत्रिणी सांगू शकतात.
friend2
आपले प्रेम व्यक्त करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या सहवासासाठी शक्य तितका वेळ द्या. त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीला तुमचे व्यक्तिमत्व समजून घेण्याची संधी द्या. अनेकदा एकमेकांच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर एकमेकांचे विचार, मते समजून घेता येतात. त्यामुळे आपल्या मनातील भावनेचा स्वीकार ती व्यक्ती करणार किंवा नाही याचा अंदाज येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या मनातील जोडीदाराच्या कल्पनेला अनुरूप ती व्यक्ती आहे किंवा नाही याचा ही अंदाज आपल्याला येतो.
friend3
मनातील भावना व्यक्त केल्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात होताना, त्या व्यक्तीची आणि आपली वैयक्तिक ‘स्पेस’ मिळत राहील याची खबरदारी घ्या. त्यामुळे सतत एकमेकांच्या बरोबरच राहावे अशी अपेक्षा करू नये. एखाद्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये असल्याने त्या व्यक्तीने स्वतःचे अस्तित्व विसरून आपल्यासाठीच जगावे असे केवळ चित्रपटांमध्येच घडत असते. वास्तविक आयुष्यामध्ये असे घडणे शक्य नाही आणि ते योग्यही नाही. एखाद्याशी रिलेशनशिप मध्ये असतानाही स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगताना, आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला समाविष्ट करून घेणे साधता यावयास हवे.

Leave a Comment