आजकाल आपण एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूच्या पॅकेजिंगवर वस्तूची किंमत, ती वस्तू कधी बनविली गेली याची तारीख किंवा महिना, या व्यतिरिक्त इतरही अनेक चिन्हे असतात. या चिन्हांचा अर्थ नेमका काय असती हे आपल्याला ठाऊक असतेच असे नाही. विशेषतः अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील असलेल्या पॅकेजिंगवरील चिन्हे समजून घेणे जास्त अगत्याचे असते. या चिन्हांच्या द्वारे या वस्तूची सर्व माहिती ग्राहकाला उपलब्ध करून देण्यात येत असते. म्हणूनच या चिन्हांचे अर्थ नेमके काय आहेत हे जाणून घेऊ या.
रिसायक्लिंगचे चिन्ह किंवा ‘मोबियस लूप’ हे चिन्ह ती वस्तू रिसायकल करता येण्यासारखी आहे किंवा नाही हे दर्शविते. क्वचित या चिन्हाच्या सोबत ती वस्तू बनविण्यासाठी आधी रिसायकल केलेले मटेरियल वापरले गेले असल्यास तशी ही सूचना पॅकेजिंगवर दिलेली असते. मोबियस लूप हे चिन्ह वस्तू रिसायकल केली जाऊ शकते हे जरी दर्शवित असले, तरी ही वस्तू बनविण्यासाठी वापरले जाणारे अनेक प्रकारचे लॅमिनेशन, किंवा प्लास्टिक रिसायकल होऊ शकेलच असे नाही.
कचऱ्याच्या बास्केटमध्ये कचरा टाकणाऱ्या आकृतीच्या चिन्हाला ‘टायडी मॅन’ म्हटले जाते. वस्तूचा वापर करून झाल्यानंतर या वस्तूची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याची सूचना देणारे हे चिन्ह आहे. अनेक विद्युत उपकरणांवर ‘एनर्जी एफीशियन्सी लेबल्स’ असतात. त्या उपकरणासाठी किती विजेचा वापर होणार असून, ही वस्तू वापरण्यासाठी लागणाऱ्या विजेवर कितपत खर्च होणार आहे याचा अंदाज ग्राहकांना करून देण्याच्या उद्देशाने हे लेबल फ्रीज, एसी, गीझरसारख्या वस्तूंवर लावलेले पहावयास मिळते. उड्या मारणाऱ्या सशाचे ( ‘लीपिंग बनी’ )चिन्ह एखाद्या वस्तूवर असल्यास ती वस्तू बनवित असताना प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा अपाय करण्यात आला नसल्याची खात्री देणारे हे लेबल आहे.
एखाद्या वस्तूवर मातीच्या मडक्याचे चिन्ह असल्यास ही वस्तू पर्यावरणाची सुरक्षा लक्षात घेऊन बनविण्यात आली असून ही वस्तू संपूर्णपणे इको फ्रेंडली असल्याचे दर्शविणारे हे चिन्ह आहे. तसेच ‘जैविक भारत’ चे वस्तूवर असलेले चिन्ह ती वस्तू पूर्णतया जैविक असल्याचे दर्शविते.