कहाणी बीजिंगमध्ये बनलेल्या ‘रूफटॉप व्हिला’ची

beijing
चीनमधील बीजिंग शहरातील एका सव्वीस मजली इमारतीवरील ‘रूफटॉप व्हिला’ कोर्टाने दिलेल्या आदेशाला एक वर्ष उलटून गेल्यावर का होईना, पण अखेरीस जमीनदोस्त करण्यात आला आहे. या व्हिलाच्या आसपास रूफटॉप लँडस्केपिंग करविण्यासाठी घरमालकाने मोठमोठे खडक, झाडे, आणि इतर वनस्पती मोठ्या प्रमाणावर येथे आणविल्या होत्या. इतकेच नव्हे तर या व्हिलामध्ये एक जिम, एक जलतरण तलाव आणि अनेक भोजनगृहे, अतिथीगृहे बांधविली गेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम एक उंच इमारतीवर केले गेल्याने इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा धोका उत्पन्न झाला होता. या घटनेमुळे अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे बीजिंग मोठ्या प्रमाणावर, खुलेआम होत असल्याचे सत्य पुन्हा एकदा उजेडात आले आहे.
beijing1
तब्बल ८,६१० स्क्वेअर फुट जागेमध्ये बांधला गेलेला हा व्हिला एखाद्या हिल स्टेशनचा आभास करविणारा होता. हा व्हिला आणि याच्या आसपासचे लँडस्केपिंग करण्यासाठी या व्हिलाच्या मालकाने अगदी मोठमोठ्या खडकांपासून ते मोठी झाडे, झुडुपे, निरनिराळ्या वनस्पती सर्व काही वापरले होते. पण त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या इतर रहिवाश्यांच्या डोक्याला मात्र चांगलाच ताप झाला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर इमारतीच्या वर अनधिकृत बांधकाम केल्याने या इमारतीमध्ये राहणाऱ्या अनेक रहिवाश्यांच्या घरांच्या भिंतींना मोठे तडे जाऊ लागले होते, तसेच अनेक ठिकाणचे पाण्याचे पाईप फुटून अनेक घरांमध्ये प्रचंड गळती सुरु झाली होती.

हा व्हिला बीजिंग येथील सव्वीस मजली इमारतीवर बांधण्यात आला असून, झ्हांग बिक्विंग नामक व्यावसायिकाच्या मालकीचा हा व्हिला आहे. पारंपारिक चायनीज मेडीसीनच्या द्वारे बिक्विंग याने कोट्यवधींची संपत्ती कमावली असून, या संपत्तीमधूनच त्याने या व्हीलाचे नूतनीकरण आणि त्याचसोबत इतरही बांधकामे करविली होती. मोठमोठ्या खडकांचा वापर येथे करण्यात आला असल्याने याचा भार इमारतीचे छत पेलू शकेल किंवा नाही याची काळजी अहोरात्र इतर रहिवाश्यांना लागून रहात असे.

या रूफटॉप व्हीलचे निर्माण संपूर्णपणे अनधिकृत असून, यासाठी कोणत्याही परवानग्या प्रशासनाकडून देण्यात आल्या नव्हत्या. पण तरीही बिक्विंगने या व्हीलाचे निर्माण कार्य सुरूच ठेवले असून, इतर रहिवाश्यांनी त्यांच्या घरांना होत असणाऱ्या नुकसानाबद्दल वारंवार तक्रारी करूनही बिक्विंगने त्यांना मुळीच दाद दिली नाही. तसेच प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाच्या वतीने देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. या व्हीलाचे बांधकाम मुख्यतः रात्रीच्या वेळेतच करण्यात येत असे, तसेच बिक्विंगच्या घरी सातत्याने होणाऱ्या पार्ट्या आणि त्यामधील कर्कश्श आवाजातील संगीत आणि आलेल्या पाहुण्यांचा गोंगाट यामुळेही इमारतीतील इतर रहिवासी त्रासलेले होते.

अखेर या इमारतीवर बांधण्यात आलेल्या या अनधिकृत बांधकामाची अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेऊन हे बांधकाम पाडून टाकण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले. हे आदेश देण्यात आल्यानंतर आता या व्हीलाचे बांधकाम पाडण्यात आले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर बिक्विंगने कोणतीही हरकत घेतली नसली, तरी पाडून टाकलेले बांधकाम हे केवळ शोभेसाठी उभारण्यात आल्याच्या, आणि त्यामध्ये काहीही बेकायदेशीर नसल्याच्या म्हणण्यावर बिक्विंग ठाम असल्याचे समजते.

Leave a Comment