आजमावून पाहा जास्वंदीचा चहा

hibiscus-tea1
जास्वंदीच्या फुलाचे महत्व आपल्याकडे मोठे आहे. गणपतीबाप्पाचे हे फुल आवडते आहेच, पण त्याशिवाय हे फुल उत्तम औषधी म्हणूनही वापरले जात असते. जास्वंदीची फुले आणि पाने खोबरेल तेलामध्ये कढवून हे तेल केसांना लावल्याने अकाली पांढरे झालेले केस पुनश्च काळे होतात, तसेच केसगळती थांबून केसांची चांगली वाढ होते. जास्वंदीची फुले वापरून बनविलेला चहा किंवा काढा देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम समजला जातो. जास्वंदीची फुले भारतामध्ये बहुतेक ठिकाणी सहज उपलब्ध असून, हा चहामध्ये अनेक पौष्टिक तत्वे असून, यामध्ये कॅफीनचे प्रमाण नगण्य असते. या चहाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहून कोलेस्टेरोलचे प्रमाणही नियंत्रणात राहते. या चहाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढत असून, चयापचय शक्ती देखील सुधारते.
hibiscus-tea2
‘हिबिस्कस टी’ किंवा जास्वंदीचा चहा बनविण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा वापर केला जात असून, या चहाला फुलांप्रमाणेच लाल रंग येतो. या चहाची चव काहीशी आंबटसर असून, हा चहा गरम किंवा गार पिता येतो. या चहामध्ये अँटी ऑक्सिडंटस् आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर आहे. या चहामध्ये लोहाची मात्र ही मुबलक असून कॅफीनचे प्रमाण अतिशय कमी असल्याने फिटनेस शौकिनांसाठी या चहाचे सेवन लाभदायक ठरते. यामध्ये पोटॅशियम आणि अ जीवनसत्वही आहे. या कारणांस्तव या चहाचे सेवन दररोज करणे चांगले. अनेक देशांमध्ये आता या जास्वंदीचा चहा ग्रीन टी ला पर्याय म्हणून सेवन केला जात आहे.
hibiscus-tea
हा चहा बनविण्यासाठी खास जास्वंदीच्या चहाच्या टी बॅग्ज बाजारामध्ये मिळतात, त्यांचा वापर केला जाऊ शकतो. त्याशिवाय हा चहा घरी तयार करण्यासाठी दोन कप ताजी जास्वंदीची फुले, किंवा अर्धा कप वाळविलेल्या जास्वंदीच्या फुलांची पावडर, आठ कप पाणी, पाव कप मध, तीन मोठे चमचे लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज आहे. जर चहा बनविण्यासाठी ताजी फुले वापरली जाणार असतील, तर या फुलांच्या मधील तुरा काढून टाकावा. त्यांतर ही फुले धुवून घेऊन आठ कप पाण्यामध्ये घालून हे पाणी उकळावे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवावे. हे झाकण पंधरा मिनिटे राहू द्यावे. त्यानंतर या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून चांगले मिसळावे आणि मग हा चहा गाळून घ्यावा. हा चहा गरम किंवा थंड करून पिण्यास द्यावा. या चहाचे सेवन गर्भवती महिला, कर्करोगाचे उपचार घेणारे रुग्ण, कमी रक्तदाब असणारऱ्या व्यक्तींनी कमी प्रमाणात करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment