आर्थिक पाहणी अहवाल : कोरोनामुळे राज्याच्या स्थूल उत्पन्नात एक लाख 56 हजार 925 कोटींची घट


मुंबई : कोरोना महामारीचा मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला. अनेक महत्वाच्या बाबी या अहवालात समोर आल्या आहेत. एक लाख 56 हजार 925 कोटींची घट राज्याच्या स्थूल उत्पन्नात झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्याचे दरडोई उत्त्पन्न कमी झाले असून कृषी क्षेत्र सोडल्यास सर्वच क्षेत्राला फटका बसल्याचे अहवालातून समोर आले आहे.

2020-21 च्या पूर्वअनुमानानुसार उणे 8 टक्के वाढ राज्य अर्थव्यवस्थेत तसेच उणे 8 टक्के वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेत अपेक्षित आहे. यात कृषी आणि संलग्न क्षेत्रात 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहेत तर उद्योगात उणे 11.3 टक्के आणि सेवा क्षेत्रात उणे 9 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर वने आणि लाकूड तोडणी 5.7 % वाढ अपेक्षित असून मत्स्यव्यवसाय आणि मस्त्य शेतीमध्ये 2.6% वाढ अपेक्षित आहे. वस्तू निर्माण उणे 11.8%, बांधकाम उणे 14.6% वाढ अपेक्षित आहे. त्याचा परिमाण उद्योग क्षेत्रात उणे 11.3% वाढ अपेक्षित आहे.

2020-21 मध्ये वार्षिक कर्ज योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रासाठी वार्षिक लक्ष्य 93 हजार 626 कोटी होते. 2020-21 मध्ये 40 हजार 515 कोटी रुपये पीक कर्ज डिसेंबर अखेर वित्तीय संस्थेद्वारे वाटप झाले. ते 2019-20 मध्ये 28 हजार 604 कोटी एवढे होते. 30 हजार 14 कोटी रुपये कृषी मुदत कर्ज 2020-21 मध्ये सप्टेंबर अखेर वाटप करण्यात आले तर 2019-20 मध्ये हे कर्ज 34 हजार 427 कोटी होते.

राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेत पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले. पीडित शेतकऱ्यांना कमाल 2 हेक्टर क्षेत्रातीतील शेतपिकांसाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये फळ पिकांसाठी 25 हजार प्रति हेक्टर या दराने दोन हफ्त्यात चार हजार 374.43 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

पहिल्या सुधारित अंदाजानुसार 2019-20 चे सांकेतिक स्थूल उत्पन्न 28,18,555 कोटी एवढे होते. तर 2018 -19 मध्ये 2519628 कोटी होते. 2019-20 मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्त्पन्न 2134065 कोटी होते तर 2018-19 मध्ये 2033314 कोटी होते. सन 2019-20 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न 2,02,130 कोटी होते तर 2018-19 मध्ये 1,87,018 कोटी होते.

वर्ष 2019-20 च्या तुलनेत 2020-21 च्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नात 1,56,925 कोटी घट अपेक्षित आहे. 2020-21 चे दरडोई उत्पन्न 1,88,784 अपेक्षित आहे. 2020-21 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा 3,47,457 कोटी तर 2019-20 सुधारित अंदाजानुसार 3,09,881 कोटी आहे.

अर्थसंकल्पीय अंदाज 2020-21 नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे 2,73,181 कोटी आणि 74,276 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजनानुसार महसुली जमा 3,47,457 कोटी तर 2019-20 सुधारित अंदाजानुसार 3,09,881 कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाज 2020-21 नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे 2,73,181 कोटी आणि 74,276 कोटी आहे.