घरात घुसून महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक


ठाणे – ठाणे पोलिसांनी जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना अटक केली आहे. त्यांना अटक महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी झाली आहे. तेलवणे यांच्यावर एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती गुरुवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मध्यरात्री (काल रात्री) जवळपास १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी घरात घुसून नगरसेवक असलेल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. याप्रकरणी तेलवणे यांच्यावर आयपीसी कलम 452 (बळजबरी घरात प्रवेश), 354 (विनयभंग), 354 अ (लैंगिक छळ) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

एकीकडे राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडेंवर झालेले आरोप आणि त्यानंतर अलिकडेच पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आलेला असताना, आता घरात घुसून महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.