आपल्या देशाची गरज पुर्ण करण्याऐवजी आपण लसीचे डोस इतर देशांना दान करत आहोत : उच्च न्यायालय


नवी दिल्ली – देशामध्ये सुरु असणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या विषयावरुन दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही फटकारले आहे. एकतर लसी आपण बाहेरच्या देशांना दान करत आहेत किंवा विकत आहोत, पण आपल्या देशातील नागरिकांचे लसीकरण करत नसल्यामुळे या बाबतीत जबाबदारी व तातडी यांची जाणीव असायला हवी, असे म्हणत न्यायालयाने केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसंदर्भात आक्षेप नोंदवला आहे. तसेच ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोव्हिशिल्ड’ या लशींचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी आपली लस निर्मितीची क्षमता जाहीर करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

अधिक लसी पुरवण्याची सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया व भारत बायोटेक या कंपन्यांची क्षमता आहे, पण ते त्याचा पुरेपूर उपयोग करत नसल्याचे दिसते, असे मत न्या. विपिन संघी व न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठने व्यक्त केले आहे. सध्याच्या पद्धतीनुसार, ६० वर्षांवरील व्यक्ती किंवा सहव्याधी असलेल्या ४५ ते ६० वर्षांदरम्यानच्या व्यक्ती यांना लस देण्यात येते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणाऱ्या लोकांच्या श्रेणीवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यामागील तर्कसंगती काय याचेही शपथपत्राद्वारे स्पष्टीकरण द्यावे, असेही न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे.

शपथपत्राद्वारे सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया व भारत बायोटेक या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादन क्षमतेसंदर्भातील माहिती जाहीर करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लसींची दर दिवशी, दर आठवड्याला आणि महिन्याला किती डोस निर्माण केले जातात, तसेच लसीचा किती साठा आता उपलब्ध आहे यासंदर्भातील माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच लसनिर्मितीची क्षमता वाढवता येईल, या संदर्भातही न्यायालयाने विचारणा केली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारला अधिक प्रमाणात लस पुरवठा करण्यासंदर्भातील यंत्रणा आणि साखळी पुरवठा करता येईल, या याबाबतीही न्यायालयाने विचारणा केली आहे.

दिल्लीमधील न्यायालय परिसरात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधांची पाहणी करुन त्या ठिकाणी कोरोना लसीकरणाची केंद्रे उभारली जाऊ शकतात काय याबाबत आपल्याला अहवाल सादर करावा, असे न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले. ९ आणि १० मार्चपर्यंत शपथपत्रांवर सर्व संबंधित संस्थांबरोबरच केंद्र आणि दिल्ली सरकारने माहिती सादर करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. पुढील सुनावणी त्यानंतरच घेण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.