सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी महिलांसंदर्भातील आरोप करताना संयम ठेवायला पाहिजे – अजित पवार


मुंबई – सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी महिलांसंदर्भातील वृत्तांबाबत चर्चा करताना, आरोप करताना संयम ठेवायला पाहिजे आहे. प्रकरणातील तथ्य तपासणी करुनच अशा प्रकरणांबाबत अधिक बोलायला हवे. कोणत्याही महिलांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. आपल्या सर्वांचीच ती भावना आहे. त्याबाबत दुमत नाही. पण प्रतिक्रिया देताना, आरोप करताना संयम ठेवायला पाहिजे आणि जबाबदारीने बोलले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनात मांडलं आहे.

दरम्यान, गुरुवारी औरंगाबाद शहरातील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने महिला रुग्णाकडून शरीर सुखाची मागणी करत बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आज विरोधकांनी या प्रकरणी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. दरम्यान, अजित पवार यांनी अधिवेशनात संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले.

आज अधिवेशन सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमधील घटनेचा उल्लेख करत ही घटना गंभीर असून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विधानसभेत महिलांसंदर्भातील प्रकरणावर सर्वांनीच जबाबदारीने बोलले पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

औरंगाबादमध्ये एका कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर डॉक्टरांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गंभीर असून त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु महिलेवर बलात्कार झालेला नाही. प्राथमिक चौकशी करून त्या डॉक्टरला बडतर्फ केले आहे. तरीही वरिष्ठांकडून याची सखोल चौकशी केली जाईल. संबंधित डॉक्टर दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी अजित पवारांनी दिले.