सायनाच्या बायोपिकचा टीझर रिलीज


सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांची चलती असून अनेक चर्चित, प्रसिद्ध, यशस्वी व्यक्तींवर आधारित कथा चित्रपटाच्या रुपात लोकांसमोर मांडण्यात येत आहे. अशाच एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती व्यक्ती म्हणजे भारताची फुलराणी अर्थात बँडमिंटनपटू सायना नेहवाल. या बायोपिकमध्ये परिणीती चोप्रा सायना नेहवालची भूमिका साकारत आहे. सायना नेहवाल बनून परिणीती बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

1 मिनिट 23 सेकंदाचा हा टीझर असून महिला सशक्तीकरणाने याची सुरुवात होते. यात बॅडमिंटन कोर्टवरील सायनाच्या भूमिकेतील परिणीतीची झलक पाहायला मिळत आहे. या टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढेल यात शंका नाही.

यापूर्वी श्रद्धा कपूर सायनाच्या भूमिकेत झळकणार होती. पण तिने बिझी शेड्यूलमुळे चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर या चित्रपटासाठी परिणीतीची निवड करण्यात आली. दरम्यान, या चित्रपटात मानव कौल पुलेला गोपीचंद यांची भूमिका साकारत आहे. तर अमोल गुप्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.