राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज ९ हजार ८५५ रुग्णांची वाढ


मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर यामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही भर पडत आहे. राज्यात आज दिवसभरात ९ हजार ८५५ नवीन कोरोनाबाधित वाढले असुन, ४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या २.४० टक्के एवढा आहे. तर, आज ६ हजार ५५९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,४३,३४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.७७ टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,०९,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,७९,१८५ (१३.२० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,६०,५०० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ३ हजार ७०१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. आज रोजी राज्यात एकूण ८२ हजार ३४३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात सध्या केंद्र शासनाच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मार्चपासून सुरूवात झालेली आहे. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. तसेच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जात आहे.

कोमॉर्बिड आजार ४५ ते ५९ वर्षे वयाच्या ज्या व्यक्तींना आहेत, त्यांनी कोविन अॅपवर नोंद केल्यावर ज्या डॉक्टरांकडून ते उपचार घेत आहेत, त्यांचे प्रशस्तीपत्रक घेऊन लसीकरण करावयाचे आहे. पण, यात समाविष्ट असलेल्या आजारांबाबात डॉ. अविनाश भोंडवे यांनी माहिती दिली आहे.