पुढील वर्षी दस-याच्या मुहूर्तावर रिलीज होणार रणबीर कपूर-अनिल कपूर अभिनीत ‘अ‍ॅनिमल’


नुकतीच अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षी 2022 मध्ये दस-याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती अनिल कपूर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. चित्रपटाचा टीझरही अनिल कपूर यांनी शेअर केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरची भूमिका थोडी वेगळी असणार आहे. रणबीरसह अनिल कपूर, परिणीती चोप्रा आणि बॉबी देओल यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


गुन्हेगारी विश्वावर आधारित हा चित्रपट असून यात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. तर परिणीती रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत असल्याचे समजते. बॉबी देओल रणबीरच्या भूमिकेच्या विरोधातली भूमिका साकारणार आहे. दरम्यान हा चित्रपट ‘कबीर सिंह’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनणार आहे. रणबीर पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे संदीपसोबत काम करणार आहे. तर या चित्रपटातून परिणीती आणि रणबीर देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.