अजित पवारांची ‘वीज कनेक्शन तोडणी’ला स्थगिती


मुंबई – विधानसभेत आज कोरोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून गोंधळ उडाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. भाजप त्यावरून आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेनंतर सरकारचे आभार मानले.

भाजप आमदारांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. भाजपने वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपने केल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.

वाढीव वीज बिल मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. वीज कनेक्शन राज्यात कापली जात आहेत. कोरोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. अजित पवार त्यावर बोलताना म्हणाले, मी राज्य सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा जोपर्यंत होत नाही, शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणे तोपर्यंत थांबण्यात येईल. राज्यपालांच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा असल्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचे समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

वीज कनेक्शन तोडणी थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केल्यानंतर अजित पवार आणि सरकारचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. फडणवीस म्हणाले, अतिशय योग्य निर्णयाची घोषणा केली, मी त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कुणाचीही वीज तोडण्यात येणार नाही. याबद्दल सरकारचे आभार मानतो. ज्यांची वीज तोडली, त्यांच्या जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.